मध्यरात्रीपासूनच सुरक्षा जवानांचा संशयित परिसराला वेढा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील मित्रीगाम येथे शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दोन दहशतवादी जंगलात लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच पुलवामाच्या मित्रीगाम भागात दोघांमध्ये चकमक सुरू झाली. शनिवारी सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरूच होती. या मोहिमेदरम्यान येथे अतिरिक्त सुरक्षा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईबाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले. सदर दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन आणि द रेझिस्टन्स फ्रंट ‘टीआरएफ’साठी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यापूर्वी 28 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली होती.









