युगांडा देशाचाही दौरा करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर हे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी 10-15 एप्रिलदरम्यान युगांडा आणि मोझाम्बिकच्या दौऱयावर असणार आहेत. विदेशमंत्री सर्वप्रथम 10-12 एप्रिलपर्यंत युगांडाचा दौरा करतील अशी माहिती विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
या दौऱयात जयशंकर हे युगांडाचे विदेशमंत्री जनरल जे.जे. ओडोंगा यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील तसेच तेथील प्रमुख अन् मंत्र्यांची भेट घेणार आहेत. युगांडाच्या जिंजा शहरातील राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाच्या एका कॅम्पसचे उद्घाटन जयशंकर यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर जयशंकर हे युगांडातील जलपुरवठा योजनेच्या कार्य शुभारंभ सोहळय़ात सामील होतील. युगांडातील व्यापार तसेच व्यावसायिक प्रतिनिधींना ते संबोधित करणार आहेत. युगांडातील भारतीय समुदायाशी ते संवाद साधणार आहेत.
जयशंकर 13-15 एप्रिलपर्यंत मोझाम्बिकच्या दौऱयावर असतील. भारताच्या कुठल्याही विदेशमंत्र्याचा हा पहिलाच मोझाम्बिक दौरा असेल अशी माहिती विदेशमंत्रालयाने दिली आहे. या दौऱयात जयशंकर हे मोझाम्बिकच्या अध्यक्षांना भेटतील तसेच तेथील विदेशमंत्री वेरोनिका मॅकामो यांच्यासोबत संयुक्त आयोगाच्या बैठकीच्या 5 व्या सत्राचे सह-अध्यक्षत्व सांभाळणार आहेत.









