श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील शाहपूर येथे 8-9 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. रविवारी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला, तर दोन जण जखमी झाले. जम्मू विभागातील पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवादी कारवायांचा सुगावा जवानांना मिळाला. यावर जवानांनी विशेष मोहीम हाती घेत दहशतवाद्यांना आव्हान दिले. यावेळी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला.
रविवारी पहाटेच्या सुमारास दहशतवादी नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय लष्कराच्या जवानांना सीमेवरील बॅरिकेडजवळ संशयास्पद हालचाल दिसली. काही काळ या हालचालींवर नजर ठेवल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी बॅरिकेडच्या अगदी जवळ आलेल्या या संशयितांना इशारा दिला. आव्हान दिल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एक घुसखोर जागीच ठार झाला, तर उर्वरित घुसखोर सीमेवरील बॅरिकेडजवळील जंगलात पळून गेले. सैनिकांच्या गोळीबारात एक घुसखोर मारला गेल्याचे जम्मूमधील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. या संघर्षानंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून तेथे शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी 24 मार्च रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील तंगधार भागात सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय लष्कराने ठार केले होते.









