कुडाळ :
पिंगुळी लोककला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राम जन्मोत्सव, कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, फुगडी, पांगुळ बैल, गोंधळ, राधानृत्य आदी लोककलाविष्कार सादर करण्यात आले. ठाकर समाजाच्या या विविधांगी लोककलांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘पिंगुळी लोककला महोत्सव-2025’ चे आयोजन पिंगुळी–ठाकरवाडी म्युझियम (पिंगुळी) च्या पटांगणावर करण्यात आले आहे. शासनामार्फत जिल्ह्यात प्रथमच हा लोककला महोत्सव होत आहे.
या लोककला महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील ठाकर समाजाने गेल्या कित्येक वर्षांपासून कला व सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत पिंगुळी गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हीच ओळख पिंगुळी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांसमोर येईल, या उद्देशाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या आयोजनात व पिंगुळी गावातील सर्व ठाकर ग्रामस्थ, जिल्हास्तरीय ठाकर समाजातील सामाजिक संस्था व ठाकर ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव सध्या सुरू आहे.
काल सायंकाळी ठाकरवाडी म्युझियम (पिंगुळी) येथे या लोककला महोत्सवाचे उद्घाटन पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मोहन रणसिंग, सांस्कृतिक विभाग अधिकारी मिलिंद बिर्जे, भास्कर गंगावणे, गणपत मसगे, गुंडू मसके आदी उपस्थित होते.
भगवान रणसिंग म्हणाले, ठाकर समाजाच्या चारशे–पाचशे वर्षांपूर्वीच्या लोककलेला शासन दरबारी कला सादर करण्याच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे, ही निश्चितच समाजासाठी भूषणावह बाब आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते लोककलाकार गणपत मसगे, त्यांचे कुटुंबिय व सहकलाकार यांनी ही कला पुढे नेण्यासाठी व या कलेचे जतन करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहेत.
मिलिंद बिर्जे म्हणाले, ठाकर लोककलांचा विकास झाला पाहिजे. त्यांच्या विविध कलांना व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन पातळीवर निश्चितच प्रयत्न केले जातील. या कलांचे जतन करून ही कला पुढे नेण्याचे लोककलाकार गणपत मसगे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, 24 फेब्रुवारी रोजी तरवा गीत, दोडामार्ग येथील पारंपरिक राधानृत्य, कट्टा–मालवण येथील गोंधळ व संबळ–तुणतुणे वादन, चामड्यांच्या बाहुल्यांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव नागरिकांसाठी मोफत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी पिंगुळी लोककला महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
- शासनाकडून लोककलांचा सन्मान!
लोककलाकर गणपत मसगे म्हणाले, हा महोत्सव होण्यासाठी शासन दरबारी गेले वर्षभर प्रयत्न केले जात होते. ठाकर लोककलाकारांना वेगळे व्यासपीठ देत सरकार व सांस्कृतिक खात्याने ठाकर लोककलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. हा महोत्सव ठाकर समाजाकडून संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना सांस्कृतिक कला पर्वणी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








