दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यात रविवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटगे, परमे, वायंगणतड आदी भागात केळी बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जीवाचे रान करून उभ्या केलेल्या केळी बागायती जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे केळी बागायतीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या घोटगे गावावर मोठे संकट कोसळले आहे.
तिलारी परिसर व घोटगे, परमे आदी गावांमध्ये रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. या वादळी पावसाने गावातील सर्व शेतकऱ्यांच्या 45 हजाराहून अधिक केळी जमीनदोस्त झाल्या. घोटगे गावातील शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून उभ्या केलेल्या केळी बागायती भुई सपाट झाल्याने भरत दळवी, संदीप दळवी, विनय दळवी, नरेश काळबेकर, महेश दळवी, बाबा दळवी आदी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
- पाच मिनिटात होत्याचे नव्हते
बागायतदार संदीप दळवी म्हणाले की, रक्ताचे पाणी करून उभ्या केलेल्या केळी बागायती आज पाच मिनिटात जमीनदोस्त झाल्या. भाडे करारावर घेतलेल्या जमिनी आणि त्यात मेहनतीने केळी बागायती केली होती.
- उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट
घोटगे गाव हा केळी बागायतीवर आपली रोजीरोटी चालवतो. केळी बागायती शिवाय दुसरे उदरनिर्वाहाचे साधनही नाही. त्यामुळे आता उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या तोंडचा घास हिरावून नेला यापेक्षा मोठे दु:ख आम्हाला नाही, असे भरत दळवी म्हणाले.
- सातबारा वगळून नुकसानीप्रमाणे पंचनामे करा
येथील शेतकरी दुसयाकडील जमिनी भाडेतत्वावर घेऊन शेती करतात. शेतकऱ्यांनी करारावर जमिनी घेऊन केळी बागायती उभ्या केल्या होत्या. वादळामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या केळीची नुकसानी पाहून महसूल विभागाने शेतकरी आपली नुकसानी दाखवेल त्या हिशेबाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. सातबाराप्रमाणे पंचनामे केले तर करारावर जमिनी घेऊन केळी बागायती केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही.
- अन्यथा चक्काजाम आंदोलन
रविवारी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास पाऊस कोसळला. पावसामुळे घोटगे गावात लाईट नाही. दूरध्वनी नेटवर्क नसल्याने कोणाला संपर्क करता आला नाही. सोमवारी महसूल विभागाने घोटगे गावात नुकसानीची पाहणी करून तात्काळ आमच्या मागणीनुसार पंचनामे करावे आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. आणि नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्यास येत्या आठ दिवसात कोणालाही पूर्व कल्पना किंवा निवेदन न देता सर्व घोटगे गाव रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन छेडेल. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल विभाग जबाबदार राहणार असल्याचे घोटगे गावातील शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी घोटगेवासीयांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे केली आहे.
- 45 हजाराहून अधिक केळी जमीनदोस्त
रविवारी झालेल्या वादळी पावसात घोटगे गावातील सर्व शेतकऱ्यांच्या 45 हजार हून अधिक केळी जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे 70 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नीतेश राणे यांनी लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घोटगे सरपंच सौ. भक्ती दळवी यांनी केली आहे.
- केर येथे गारासदृश पाऊस
दोडामार्ग तालुक्यात अचानक दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. रणरणत्या उन्हात अचानक पाऊस आल्याने अनेकांना गारवा मिळाला. मात्र, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. तालुक्यात रविवारी कोसळलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. सध्या बांधकामाची कामे सुरू असल्याने त्यात अनेकांचे सिमेंट आदी साहित्य भिजले. तर केर गावात गारासदृश पाऊस पडला. पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.








