कुडाळ :
कोमसाप कुडाळ शाखेने जिल्ह्यातील तालुका शाखांच्या कार्यकारिणी सदस्यांचा मेळावा व ‘भाकरी आणि फूल’ हे कवी संमेलन येथे आयोजित केले होते.
शाखाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा कार्यवाह विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो, सावंतवाडी शाखाध्यक्ष संतोष सावंत, कवी संमेलनाध्यक्ष डॉ. दीपाली काजरेकर, कुडाळ शाखेचे कार्यवाह सुरेश पवार, गोविंद पवार, स्नेहल फणसळकर, स्वाती सावंत आदी उपस्थित होते. मालवण, कणकवली व सावंतवाडी कोमसाप शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मंगेश मसके यांनी, आपण ऐक्य व सहकार्याने काम करून जिल्ह्यातील कोमसापच्या रुपाने साहित्यिक चळवळ पुढे नेऊया. मधु मंगेश कर्णिक यांचे स्वप्न साकार करूया, असे सांगितले. विठ्ठल कदम व भरत गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. वृंदा कांबळी यांनी, एवढी मोठी संस्था चालविताना सर्वांना जोडणारा विचारांचा मजबूत धागा असायला हवा आणि तो धागा म्हणजेच कोमसापवरील निष्ठा. कोणताही स्वार्थ न ठेवता, निष्ठेने कार्य करताना आपण कोमसापच्या माध्यमातून मोठी कार्ये करू शकतो, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सुरेश पवार, सूत्रसंचालन प्रा. गोविंद पवार, तर आभार स्वाती सावंत यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात डॉ. दीपाली काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘भाकरी आणि फूल’ या कवी संमेलनात 34 कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. यात विविध विषयांवर व विविध प्रकारच्या रचनांमधून कविता सादर झाल्या. डॉ. काजरेकर यांनी, ज्ञानेश्वरांपासून कवी केशवसुतांच्या व नंतरच्या कालखंडातील काव्यप्रवाहाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. नवोदितांनी याचा अभ्यास करावा, नवनवीन प्रयोगांमधून विविध विषयांवर कविता करण्याचा प्रयत्न करावा, असे त्या म्हणाल्या. कवी संमेलनाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यांनी केले.
कवी संमेलनात रुजारिओ पिंटो, विठ्ठल कदम, सुरेश पवार, सेलेस्तिन शिरोडकर, अॅड. नकुल पार्सेकर, मधुकर जाधव, स्वाती सावंत, ऋतुजा केळकर, नारायण धुरी, मंदार सांबारी, राजेंद्र गोसावी, सुरेंद्र सपकाळ, दीपक पटेकर, सुस्मिता राणे, अनिल पोवार, अविनाश पाटील, दिलीप चव्हाण, प्रगती पाताडे, भानुदास तळगावकर, प्रदीप केळुसकर, आदिती मसुरकर, रिमा भोसले, स्मिता नाबर, कल्पना मलये, प्रा. सुभाष गोवेकर, कॅप्टन एस. टी. आवटी, राजस रेगे, अनुष्का रेवंडकर, संतोष वालावलकर, बुधाजी कांबळी यांनी काव्यवाचन केले.








