लाखो भाविकांनी घेतले तुरबतीचे दर्शन : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : आज शिळा उरूस साजरा होणार

प्रतिनिधी /निपाणी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणीतील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर गौसपाक दस्तगीरसाहेब यांचा भर उरुस सोमवारी उत्साहात पार पडला. यावेळी दिवसभरात लाखो भाविकांनी तासन्तास रांगेत राहून तुरबतीचे दर्शन घेतले.
रविवारी गंधरात्र कार्यक्रमाने उरुसाला सुरुवात झाली. रात्री बारानंतर भाविकांकडून दंडवत घालून तुरबतीचे दर्शन घेण्यात आले. नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी दर्गा मंडप परिसरात गर्दी केली होती. रविवारी रात्रभर चव्हाणवाडा येथे गंध उगळल्यानंतर सोमवारी पहाटे चव्हाणवाडय़ातून गंधाची मिरवणूक काढून तुरबतीस गंध अर्पण करण्यात आला. उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांच्यासह श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, रणजित देसाई, संग्राम देसाई व नवलीहाळकर सरकार यांच्या हस्ते दर्गा येथे गंधलेपण कार्यक्रम झाला. रात्री जिजामाता चौकात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर साडेनऊ वाजता कव्वालीचा भव्य कार्यक्रम पार पडला.
मानाच्या व नवसाच्या कंदुरीसाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिह्यातील हजारो भाविक उपस्थित होते. मंगळवारी शिळा उरूस असल्याने सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत खारीक व उदीचा कार्यक्रम जिजामाता चौकातील चव्हाणवाडा येथे होणार आहे.
बुधवारी मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना कार्यक्रम होणार आहे. पाकाळणी कार्यक्रम 11 रोजी आहे. या दिवशी चव्हाण घराण्याचे वारसदार, मानकरी लवाजम्यासह दर्गाह देवस्थान आणि संत बाबा महाराज चव्हाण समाधीस अभिषेक, गोडा नैवेद्य दिल्यानंतर मानकरी रवानगी कार्यक्रम होतो. त्यानंतर उरुसाची रितसर सांगता होणार आहे.









