हेस्कॉमच्या शहर उपविभाग-1 साठी आर. एफ. वाफटे यांची नियुक्ती
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या शहर उपविभाग-1 साठी अखेर चार महिन्यांनी का होईना, पण अधिकारी दिल्याने ग्राहकांमध्ये समाधान आहे. चार महिन्यांपासून साहाय्यक कार्यकारी अभियंता नसल्यामुळे हेस्कॉमवर नामुष्की ओढविली होती. यामुळे बरीच टीकाही झाली. परंतु अखेर आर. एफ. वाफटे यांची नियुक्ती करण्यात आल्याने हेस्कॉमला अधिकारी मिळाला आहे.
इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर असोसिएशनने ऊर्जा मंत्र्यांकडे तक्रार केल्याने तत्कालिन साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांची उचलबांगडी करण्यात आली. जून महिन्यात त्यांची बदली चिकोडी येथे झाली. त्यानंतर या पदावर एका अधिकाऱयाची नेमणूक झाली खरी. परंतु आठ दिवसांत त्यांनी इतरत्र बदली स्वीकारली. त्यामुळे मागील चार महिने साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी शहापूर, वडगाव, अनगोळ, उद्यमबागसह शहराचाही गाडा ओढून नेला.शहराचा मध्यवर्ती भाग हा उपविभाग-1 अंतर्गत येतो. त्यामुळे सर्रास कमर्शियल कनेक्शन या विभागात आहेत. त्यामुळे नेहमी ग्राहकांच्या समस्या सोडविणे महत्त्वाचे असते. त्यातच या विभागाला एकच सेक्शन ऑफिसर असल्यामुळे हेस्कॉमचा सावळा गोंधळ या माध्यमातून समोर आला होता.
वारंवार मागणी होऊनदेखील साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांची नेमणूक का होत नाही? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता. अधिकारी मिळत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे अनेकांनी हेस्कॉम अधिकाऱयांवर टीकेची झोड उठविली होती. अखेर चार महिन्यांनंतर हारुगेरी, रायबाग या विभागात काम केलेले आर. एफ. वाफटे यांची साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यामुळे कार्यभार सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.









