सिंह, वाघ, बिबटे, अस्वल पाहण्याची उत्सुकता : उत्पन्नात हळूहळू वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून अवघ्या दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढू लागला आहे. सुटीच्या दिवसात त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयाच्या महसुलात वाढ झाली आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा विकास करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध वन्यप्राणी हळुहळु दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले येथील प्राणी संग्रहालयाकडे वळताना दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावाने मध्यंतरी येथील प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे उत्पन्नही थांबले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे प्राणी संग्रहालय सर्वांनाच खुले करण्यात आले आहे. त्यामुळे हळूहळू पर्यटक पर्यटनासाठी तसेच सहलीसाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यात शाळा-कॉलेजच्याही सहली निघत आहेत. लहान मुलांची उत्सुकता वन्यप्राणी पाहण्याकडे ताणलेली असते. ती येथील प्राणी पाहून पूर्ण होत आहे. त्यामुळे येथील उत्पन्नही हळूहळू वाढू लागले आहे. सध्या दैनंदिन 30 ते 35 हजार रोज उत्पन्न मिळत आहे. मात्र या संग्रहालयात असलेल्या वन्यप्राण्यांच्या आहाराचा खर्चदेखील अधिक आहे. त्यामुळे एकूण या संग्रहालयाचे व्यवस्थापन करताना अडचणी निर्माण होत आहेत.
शनिवारी-रविवारी पर्यटकांची गर्दी
मागील दोन वर्षात प्राणी संगहालयात राज्याच्या इतर भागातून सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, तरस, हरिण, अस्वल, चितळ, सांबर, ससे यासह विविध पक्षीही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुलांसह पर्यावरणप्रेमींमध्ये वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत शनिवारी आणि रविवारी संग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
भुतरामहट्टी येथील या मिनी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी खास रस्ता तयार करण्यात आला आहे. शिवाय वन्यप्राण्यांना निवास कोठडीची उभारणी करण्यात आली आहे. मोठय़ा वन्यप्राण्यांसाठी अतिसुरक्षित जागी ठेवण्यात आले आहे. शिवाय काही वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. या सुविधेमुळे येणाऱया पर्यटकांना वन्यप्राण्यांना जवळून पाहता येत आहे. येत्या काही दिवसात येथे आणखी काही वन्यप्राण्यांबरोबरच गवीरेडे, हत्ती आणि इतर प्राणीदेखील आणावेत, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
हिंस्त्र प्राण्यांचाही प्रामुख्याने समावेश
प्राणी संग्रहालयात आतापर्यंत 25 ते 30 वन्यप्राणी दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिंह, वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे या मोठय़ा जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी लहान-मोठय़ांची येथे दररोज गर्दी होऊ लागली आहे. विशेषतः नोकर आणि कामगारवर्गाची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी आणि रविवारीदेखील प्राणी संग्रहालय खुले ठेवले जात आहे. येथे प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षांखालील मुलांसाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आकारणी केली जात आहे.
मत्स्यालयाचेही आकर्षण
प्राणी संग्रहालयात अलीकडेच आकर्षक असे मत्स्यालय उभारण्यात आले आहे. यामध्ये विविध जातीचे रंगीबेरंगी मासे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना मासे पाहायला मिळत आहेत. त्याबरोबर येथे एकाच छताखाली विविध माशांची माहिती उपलब्ध होत आहे.
पर्यटकांमध्ये उत्सुकता
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात विविध वन्यप्राणी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये प्राण्यांना पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटक येत आहेत. संग्रहालयात अद्याप विकासकामे सुरू आहेत. त्यानंतर टायगर सफारी आणि इतर सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. -विनोद अंगडी (आरएफओ भुतरामहट्टी)









