वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांसाठी आता नवा सहाय्यक प्रशिक्षक वर्ग उपलब्ध होणार असल्याची माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी दिली. हॉकी प्रशिक्षक वर्गामध्ये आता ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँथनी फारी यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या अॅनॅलिटिकल प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर भारतीय पुरुष हॉकी संघाच्या अॅनॅलिटिकल प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे आर. हॉकेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करणाऱ्या कॅनडाच्या पुरुष हॉकी संघाला अँथनी फारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2018 साली आशियाई स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविलेल्या जपानच्या महिला हॉकी संघालाही अँथनी फारी हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्कोपमन यांना आता अँथनी फारी यांची साहाय्यक प्रशिक्षक म्हणून साथ मिळेल. अँथनी फारी यांच्या मार्गदर्शनामुळे कॅनडाच्या 21 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष हॉकी संघाने कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत दोन वेळा आपली पात्रता सिद्ध केली होती.
दक्षिण आफ्रिकेचे आर. हॉकेट यांनी 2010 ते 2018 या कालावधीत 155 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. 2020 साली त्यांची नेदरलँड्सच्या महिला हॉकी संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते स्कॉटलंडमध्ये स्थलांतरित झाले. अँथनी फारी आणि हॉकेट यांच्या मार्गदर्शनामुळे भविष्यकाळात भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करतील, असा विश्वास हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी व्यक्त केला आहे.









