3 कोटी रुपये घेऊन झाले होते फरार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या द्वारकामध्ये शनिवारी रात्री गुंडांनी ईडी अधिकारी असल्याचे भासवून एका घरातून 3 कोटी रुपये लुटले. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी कारमधून पोलीस बॅरिकेडिंग तोडून पळू पाहत होते. पोलिसांनी दोन किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करत लुटण्यात आलेल्या रकमेपैकी 1 कोटी रुपये हस्तगत केले आहेत.
शनिवारी मध्यरात्री काही लोक एका घरात घुसले. या आरोपींनी आपण ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले होते. घरात हवालाचा पैसा लपविण्यात आल्याचे सांगत त्यांनी पूर्ण घराची झडती घेतली आणि 3 कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. तसेच जातेवेळी आरोपींनी घरातील सदस्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याची सूचना केली होती.
पीडित कुटुंबाने अलिकडेच जमीन विकून ही रक्कम प्राप्त केली होती. त्यांना घरात घुसलेल्या लोकांविषयी संशय वाटला होता. संबंधित लोकांच्या कारवर कुठलाच अधिकृत फलक नव्हता. तसेच त्यांच्याकडे पिस्तुल होते आणि त्यांचे वर्तन संशयास्पद वाटत हेते. गुंड घरातून निघून गेल्यावर एका सदस्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोतया अधिकाऱ्यांच्या शोधाकरता पथके तैनात करत विविध भागांमध्ये तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांना काही वेळानंतर एक कार भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले, त्यांनी कार रोखण्याचा इशारा केला, परंतु ती थांबली नव्हती. यानंतर पोलिसांनी 2 किलोमीटरपर्यंत कारचा पाठलाग करत ती रोखण्यास यश मिळविले. कार थांबताच आतील आरोपींनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना कारमध्ये 70 लाख रुपये आढळून आले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर छापे टाकत अन्य आरोपींना अटक केली आहे.









