वृत्तसंस्था / मुर्शिदाबाद
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओमध्ये ते हेल्मेटशिवाय बुलेट बाईक चालवताना दिसत आहेत. तसेच दुचाकी चालवताना ते बाईकच्या हँडलवरील हातही सोडतात. रविवार, 15 ऑक्टोबर रोजी बेरहामपूरमध्ये बायपास रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले असताना हा प्रकार घडला असून या व्हिडिओमुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरू आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेल्या आपल्या दौऱ्यादरम्यान चौधरी यांनी रॉयल एनफिल्ड बाईकवर आपल्या घरापासून बेरहामपूरपर्यंतचे सुमारे 11 किलोमीटरचे अंतर कापले. यावेळी त्यांच्या ताफ्यात इतरही अनेक दुचाकी होत्या. मात्र बाईक चालवताना काँग्रेस नेत्याने हेल्मेटऐवजी टोपी घातली होती. तसेच दुचाकीवर मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटशिवाय बसली होती. यासंबंधी 1.13 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांच्या ताफ्यात अनेक दुचाकी होत्या. त्यापैकी मोजक्मयाच लोकांनी हेल्मेट घातले होते.
व्हिडिओवर काय म्हणाले?
जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी अधीररंजन चौधरी यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. याबाबत त्यांना प्रत्यक्ष विचारणा केली असता, पोलिसांनी मला शिक्षा केली तर काही हरकत नाही, पण मी ज्या ठिकाणी बाईक चालवत होतो तेथे लोक नव्हते. आणि मी खूप दिवसांनी बाईक चालवली. कारण त्या जागेशी माझ्या आठवणी जोडलेल्या आहेत.’ असे सोयीस्कर उत्तर दिले आहे.









