मनपाच्या आरोग्य स्थायी समितीची तातडीने बैठक : याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये होणार चर्चा
बेळगाव : सफाई कंत्राटदाराने आपणाला मानसिक त्रास दिला जात असून मला न्याय द्यावा, असे महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत तातडीने महापालिकेमध्ये आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये संबंधित कंत्राटदाराच्या कारभाराबद्दल चर्चा करण्यात आली. सदर कंत्राटदार हा कामगारांची पिळवणूक करत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यामुळे कंत्राटदाराच्या विरोधात सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करून कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी स्पष्ट केले. कंत्राटदार आपल्या नातेवाईकांची नावे सफाई कामगार म्हणून दाखल करून त्यांच्या नावाने वेतन घेत आहे. याचबरोबर अनेक कामगारांचे एटीएम कार्ड आणि बँक पासबुकदेखील त्याने स्वत:कडेच ठेवून घेतल्याच्या तक्रारी सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. याचबरोबर अनेक सफाई कामगारांना व्याजाने पैसे देत असून वेतन झाल्यानंतर त्यामधून ती रक्कम वजा केली जाते. एकप्रकारे आमची पिळवणूक सदर कंत्राटदार करत असल्याची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांनी दिली आहे, असे रवी धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
138 कामगारांचे वेतन आम्ही त्यांना देण्यास सांगितले नसल्याचेही स्पष्टीकरण रवी धोत्रे आणि साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी दिले आहे. सफाई कंत्राटदार वाय. बी. गोल्लर यांच्याकडे 12 वॉर्डांचे काम असून सहा पॅकेज देण्यात आले आहेत. 191 सफाई कर्मचारी काम करत आहेत. मात्र त्यांना वेतन योग्य प्रकारे दिले जात नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. सदर कंत्राटदाराने आम्ही मानसिक त्रास देत असून मी आत्महत्या करणार, असा इशारा दिला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे धमकी दिली होती. त्यामुळे याबाबत बैठकीमध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. एकूणच सफाई कंत्राटदारांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल आरोग्य स्थायी समिती अध्यक्षांनी घेतली आहे. मात्र बैठकीला आरोग्य स्थायी समितीचे इतर सदस्य अनुपस्थित होते. याचबरोबर महानगरपालिकेमध्ये याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असल्याने नमके गौंडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्त सत्य उलगडणार का?
महापालिकेमध्ये 138 कामगार हे बेकायदेशीर नेमल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे कामगार कोणी नियुक्त केले? याचबरोबर त्यांचे वेतन कोणी द्यायचे? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. अनेक नगरसेवक ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे बोलत आहेत. तर कंत्राटदारानेही अशाप्रकारे निवेदन दिल्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे या प्रकरणाचा योग्य छडा लावणार का आणि संबंधितांवर योग्य कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणामध्ये महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.









