घाबरण्याचे कारण नाही; वन खात्याचे आवाहन
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेच्या पाठीमागे बिबट्या आल्याची अफवा बुधवारी पसरविण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वन खात्याने तातडीने दाखल होऊन परिसराची पाहणी केली आहे. शिवाय सदर ठसे हे बिबट्याचे नसून कुत्र्याचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन वन खात्याने केले आहे. गतवर्षी रेसकोर्स परिसरात बिबट्याने एक महिना तळ ठोकला होता. दरम्यान शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर बिबट्या वन खात्याच्या हातून निसटला होता. पुन्हा शहरात बिबट्यासदृश प्राणी आल्याची अफवा पसरल्याने गोंधळ उडाला होता. दरम्यान वन खात्याच्या यंत्रणेने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्यासदृश पायांच्या ठशांची पाहणी केली. शिवाय हिंस्त्र प्राण्यांसंबंधी कोणत्या इतर बाबी सापडतात का, याबाबतही तपासणी केली. मात्र बिबट्या किंवा इतर हिंस्त्र प्राण्यांविषयी कोणतेच पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, असे स्पष्ट केले. हिंस्त्र प्राण्यांविषयी पायाच्या खुणा, विष्टा आणि इतर काही सापडते का, याबाबत तपासणी केली. मात्र तपासाअंती वन खात्याला कोणतीच बाब मिळाली नाही. अखेर वन खात्याने शहरात केवळ बिबट्याची अफवाच असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही केले आहे.









