अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा माणसाच्या सचेतन शरीरात ईश्वरी अंश असलेला आत्मा हजर असतो. तो बुद्धीला समजण्याच्या पलीकडे असून मन त्याची कल्पना करू शकत नाही. तो शब्दज्ञानाच्या पलीकडे आहे. ब्रह्माचा अंश म्हणून आत्मा शरीराच्या सर्व हालचालींना आवश्यक ती ऊर्जा पुरवतो. त्यामुळे ब्रह्म किंवा त्याचा शरीरात असलेला अंश दिसत नसला तरी अस्तित्वात असतो हे नक्की. आणखी एक सांगायचं म्हणजे आत्मा शरीराला ऊर्जा पुरवत असला तरी शरीराच्या कोणत्याही हालचालींना किंवा ते करत असलेल्या कर्माला जबाबदार नसतो. हे जे सगळं जग हलताना, फिरताना दिसतंय ते मुळात जड किंवा अचेतन असल्याने त्याच्यात स्वत:हून काहीही करायची ताकद नसते. ह्याउलट आत्मा मात्र कायमचा स्वत: सिद्ध असतो आणि कोणत्याही परिस्थितीत ह्यात बदल होत नाही. तो निरनिराळे भेद दाखवतो पण स्वत: अभेद असतो. निरनिराळी द्वंद्वे प्रकाशित करतो पण स्वत: निर्द्वंद्व असतो. म्हणून स्वत: परिपूर्ण असलेला आत्मा संसारास कारणीभूत आहे असे त्याच्यावर होणारे आरोप चुकीचे आहेत. उद्धवा मुळातच समोर दिसणारे जग हाच एक आभास आहे आणि आत्मा हे एकमेव सत्य आहे हे जर लक्षात घेतले तर आत्मा निर्द्वंद्व आहे, अद्वैत आहे किंवा तो मुळातच अस्तित्वात आहे किंवा नाही ह्या चर्चाच अनावश्यक आहेत. कारण एका आत्म्याखेरीज येथील सर्व खोटेच असल्याने आत्म्यासंबंधी चर्चा करण्यास कुणी अस्तित्वातच नाही हेच सत्य आहे. आता आत्म्याची आणखीन वैशिष्ट्यो तुला सांगतो. सदोदित परिपूर्ण असलेला आत्मा हा नित्यमुक्त असून त्रिगुणांच्या पलीकडे असतो. आकाश हे पंचमहाभूत पृथ्वीवरील सर्व गोष्टीपासून अलिप्त असते. पण आत्मा हा आकाशापेक्षाही अलिप्त असतो. म्हणून त्याला अतिअलिप्त म्हंटलस तरी चालेल. आता अशा अतिअलिप्त असलेल्या आत्म्याला प्रपंचाचे भान असते असे म्हणणे हाच एक आभास होय. खरं तर प्रपंच हाच एक आभास आहे आणि हा आभासी प्रपंच परमात्म्याने निर्माण केलेला असल्याने त्याच्याशिवाय ह्या प्रपंचाला काही स्थानच नाही. असा हा आभासी असलेला प्रपंच उत्पन्न होतो, वाढतो आणि शेवटी लय पावतो हाही एक अभासच होय. कारण ही एक ईश्वरी लीला आहे. ज्याप्रमाणे कोळी स्वत:च्या शरीरातून निघणाऱ्या चिकट पदार्थापासून तंतू तयार करून जाळे विणतो, त्यावर हवे तसे नाचतो आणि त्या सगळ्याचा कंटाळा आला की, ज्यापासून त्याने जाळे विणलेले असते तो तंतूयुक्त चिकट पदार्थ स्वत: गिळून टाकतो. त्याप्रमाणे परमात्मा विश्वाची निर्मिती करतो, वाढवतो आणि मनात आले की त्याचा नाश करून टाकतो. विशेष म्हणजे हा सगळा त्याचा खेळ असल्याने तो ह्या कशातही गुंतत नाही. लहान मुले नाही का, समुद्रकिनारी वाळूचा किल्ला करतात, त्याच्याशी खेळतात आणि खेळाचा कंटाळा आला की पायाने लाथाडून तो किल्ला उध्वस्त करतात तसंच हे आहे. त्याच्या मनाला येईल तोवर हा खेळ चालू रहावा म्हणू त्यात तो आत्मरूपी चैतन्य घालतो. त्यामुळे ह्या खेळातील पात्रे सजीव होतात आणि ईश्वरी इच्छेनुसार किल्ली दिलेल्या खेळण्याप्रमाणे हालचाली करू लागतात. पण म्हणून ती खरी आहेत असे कोण म्हणू लागला तरी ती खरी कशी होतील? अंधारातील दोराला कुणी साप समजले म्हणून काय तो साप होतो का? तेथे केवळ सर्पाचा आभासच असतो. परिपूर्ण परब्रह्माने निर्माण केलेला संसारच मुळी खोटा तिथं रूप, नाम, गुण, कर्म ह्यांना थारा तरी कुठून मिळणार? पण हे लक्षात न घेणारा माणूस मात्र भ्रम झाल्याप्रमाणे प्रपंच हा खरा मानतो आणि त्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करत बसतो. दोरीला साप समजणारा माणूस स्वत:ला कर्ता समजतो आणि त्या मिथ्या संसारात घडणाऱ्या गोष्टी खऱ्या समजून त्यातून प्राप्त होणाऱ्या सुखदु:खाचे भोग भोगतो. हा सर्व मायेचा खटाटोप असतो.
क्रमश:








