राजकारणात पदयात्रा, रथयात्रा, भारतमाता हे शब्द भाजपाने जितके वापरले तितके अन्य कुण्या पक्षाने वापरले नाहीत पण कळीचा महिमा वेगळाच असतो. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तोंडून हे शब्द सतत येत आहेत. कदाचित देशातील सत्तेचा वा सत्ता प्राप्तीचा मार्ग तोच असावा. हिंदी चित्रपटाचे एखादे नाव हिट झाले की तो चित्रपट भाग एक, भाग दोन, भाग तीन असा काढला जातो. आणि प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतात. भूलभूलैय्या एक, दोन अशी अनेक उदाहरणे देता येतील. समाजातले सिनेमात जाते आणि सिनेमातले समाजात येते पण दोन्हीतले संसदेतही येते हे नुकतेच दिसले. मिठी मारणे, डोळे मारणे, फ्लाईंग किस देणे वगैरे सिनेमातल्या किंवा पदयात्रेतल्या गोष्टी संसदेत करणे योग्य नाही पण ‘मी नफरतीचे राजकारण सुरु असताना मोहबतीचे दुकान उघडतो आहे’ असे नेहमी म्हणणारे राहुल गांधी यांनी संसदेत महिला सदस्यांच्या दिशेने फ्लाईंग किसची अॅक्शन केली असा आरोप पुढे आला आहे. भाजपाच्या सर्व महिला खासदारांनी त्या विरोधात आवाज उठवत लोकसभेच्या सभापतींकडे कारवाई करणेबाबत निवेदन दिले आहे. संसदेचे मंदिर, संसदेची प्रतिष्ठा, परंपरा, लौकीक, सभ्यता यावर आता जोरदार चर्चा चालली आहे. मागे एकदा राहुल गांधी अचानक आपले आसन सोडून मोदींना मिठी मारताना दिसले तेव्हा मोदींनी मिठी मारणे आणि गळ्यात पडणे असा भेद करत व राहुलना ‘युवराज’ म्हणत प्रतिहल्ला केला होता. सर्वांचे राजकारण जेथे संपते तेथून अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे राजकारण सुरु होते असे म्हटले जाते. सत्ताधाऱ्यांची अशीच भलावण केली जाते. त्यात नवे काही नाही पण ‘इंडियाच्या’ संस्कृतीत असे काही चालत असले तरी ‘भारतीय’ संस्कृतीत हे वर्ज्य आहे. भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे आणि भारतीय जनसामान्य कृषी संस्कृती व सभ्यता पाळतात. राहुल गांधींनी काँग्रेसचे पराभवामागे पराभव होऊ लागले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्षपदाची खुर्ची मोकळी करुन दिली व निवडणुका तोंडापुढे ठेऊन भारत जोडो यात्रा सुरु केली. राहुल गांधींनी कन्याकुमारी येथून ही पदयात्रा सुरु केली आणि चार हजार ऐंशी किलोमीटर चालत जात त्यांनी 30 जानेवारीला काश्मिरमध्ये यात्रेची सांगता केली. 145 दिवस ते बारा राज्यातून या यात्रेचा प्रवास केला व काँग्रेसचे वातावरण निर्माण केले. जाती-जातीत, धर्मा-धर्मात विभागला जाणारा भारत देश एकसंघ व्हावा अशी या यात्रेमागची भावना त्यांनी मांडली होती. या यात्रेनंतर झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडून आली. सत्तेची, विजयाची झिंग न्यारीच असते. या पदयात्रेनंतर देशातले वीस-बावीस पक्ष भाजपा आणि नरेंद्र मोदी, अमित शहा विरोधात एकत्र येण्यास प्रारंभ झाला. नव्या आघाडीने आपले युपीए नाव टाकून इंडिया (घ् .ऱ्. अ घ्.A.) असे नवे नाव धारण केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी वगैरेंनी या नव्या आघाडीच्या उभारणीत सहभाग घेतला आणि ही नवी आघाडी साकारली. तथापि अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी अनेक सत्तास्थाने निर्माण होऊन देशाचे, राजकारणाचे आणि अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजतात हे मतदारांनी अनुभवले आहे. त्यातच इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचे दावेदार अनेक आहेत आणि सोनिया गांधींना राहुलसाठी हे पद हवे आहे. त्यामुळेच, कोर्टाचा निकाल, राहुल गांधींनी आपले शासकीय घर सोडणे पुन्हा कोर्टाची स्थगिती आणि राहुल गांधींचे संसदेत आगमन अशी जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली होती. भारत जोडोच्या यशानंतर राहुल गांधींनी आता भारत जोडो-2 ची घोषणा केली आहे. कर्नाटकचा कौल मिळाला तसा देशाचा निवडणूक कौल काँग्रेसला, राहुल गांधींना मिळेल अशी त्यामागे भावना आहे. त्यासाठीच भारत जोडो दोन ही पदयात्रा आणि इंडिया आघाडीच्या बैठका मागून बैठका सुरु आहेत. इंडिया आघाडी हे देशासाठी नाही तर घराणेशाहीसाठी आहे अशी टीका मोदी करतात. मोदी अविश्वास ठरावाला उत्तर देताना विरोधकांना चिंध्या चिंध्या करतात आणि त्यांचाच ट्रेलर अमित शहांनी या चर्चेत सहभागी होताना बुधवारी दिला होता. भाजपाची मणिपूर चर्चेला कधीही तयारी होती व आहे असे सांगत त्यांनी विरोधकांची हवा काढून घेतली तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहूल गांधीच्या फ्लाईंग किस हावभावापासून संताप व्यक्त केला. राहूल गांधींच्या सभागृहातील आचरणावर आक्षेप नोंदवले गेले. राहुल गांधींनी मणिपूरमध्ये ‘भारत मातेची हत्या होत आहे’ वगैरे केलेली विधानेही संतापाचा विषय बनली. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव सुरु असताना आणि स्वातंत्र्यदिन अगदी समीप असताना आणि एरवीही कसे बोलले, वागले पाहिजे, यांचे भान सर्वांनीच बाळगले पाहिजे. पण राहुल गांधींना भारत जोडो पदयात्रेच्या वेळी ‘फ्लाईंग किसची’ सवय जडली असे दिसते. आता संसदेचे अधिवेशन संपताच नव्या जोमाने भारत जोडो-2 चा प्रयोग ते करणार आहेत. गुजरात ते मेघालय असा या यात्रेचा प्रवास आहे. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन ही यात्रा असणार. या यात्रेचा माहोलही तोच असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. पण भाजप आणि एनडीए शांत नाही. चोवीस तास 365 दिवस राजकारण ही त्यांची खासियत आहे व शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट आहे. या आघाडीने महाराष्ट्रात स्वत:सह सर्व पक्षांची अक्षरश: वाट लावली आहे. त्यातच पुण्यात पंतप्रधान मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एका व्यासपीठावर व पवारांनी थोपटलेली मोदींची पाठ, पवारांचा पक्ष भाजपच्या मंत्रीमंडळात अशा अनेक गंमती-जंमती सुरु आहेत. याच जोडीला नरेंद मोदी यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक घेऊन निवडणूक तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. याच बैठकीत त्यांनी शरद पवारांबद्दल केलेले ‘पात्रता असूनही काँग्रेसने शरद पवारांचे पंतप्रधान पद हुकवले’ असे केलेले विधान चर्चेचा नवा मुद्दा ठरले आहे.
Previous Articleआजचे भविष्य 11-AUGUST-2023
Next Article प्रपंच ही एक ईश्वरी लीला आहे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








