अलिकडच्या काळात लोकांना कसल्या कसल्या बाबींची पेझ असेल काही सांगता येत नाही. कित्येक लोकांच्या जगावेगळय़ा आवडीनिवडींचा धंदा करुन काही लोग पैसा मात्र बख्खळ कमावतात. कोणी आपली नखे विकून, कोणी दुसऱयांचे पाळलेले कुत्रे फिरवून, कोणी आपले ढेरपोट दाखवून पैसे कसे कमावतात हे आपण पाहिले आहे. पण ‘ढेकर’ विकून लक्षावधींची कमाई एक महिला करीत आहे, हे वाचून आपल्या आश्चर्यायाला पारावार राहणार नाही. कदाचित यावर आपला विश्वासही बसणार नाही, पण हे सत्य आहे, अशी माहिती आहे.
या महिलेचे नाव रेबेका ब्लू असे आहे. तिच्याकडून लोक तिची ‘ढेकर’ विकत घेतात. लोकांकडून मागणी आल्यावर ती एक प्लॅस्टिकची छोटी बॅग तोंडाला लावून मोठी ढेकर देते. त्या ढेकरीचा वास त्या बॅगमध्ये जातो. मग बॅग पूर्णपणे सीलबंद करुन ती ग्राहकाला पाठविते. तिच्या एका ढेकरीची किंमत 100 डॉलर्स म्हणजे जवळपास 8 हजार रुपये आहे. अशा प्रकारे तिने मोठी संपत्ती कमावली आहे. हमखास ढेकर येण्यासाठी तिला विशिष्ट पदार्थ खावे लागतात. त्यात कांदा आणि सोडा यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात असतो. या पदार्थांच्या प्रमाणाबाहेर सेवनामुळे तिचे पोट वारंवार बिघडते. ते सुधारण्यासाठी तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. हा खर्च जमेस धरुन तिने आपल्या ढेकरीची किंमत ठरविल्याचे ती सांगते.
प्रश्न एवढाच आहे, की तिचे ग्राहक या ढेकरीचे करतात काय ? त्या वासाने त्यांचे कोणत्या प्रकारचे समाधान होते ? पण कोणाची आवड काय असेल हे काय सांगावे ? या महिलेला पैसा कमाविण्याचा एक मार्ग मात्र असा सापडला आहे, की तो एखाद्या कुशाग्र बुद्धीच्या उद्योगपतीलाही कधी सुचणार नाही.









