प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव उतर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळूरकर यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर परिसरामध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी संपूर्ण शिवाजीनगर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा जयघोष करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळूरकर यांना निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रचार फेरीमध्ये कोल्हापूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष विजय देवने यांच्यासह कोल्हापूर शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते. संपूर्ण शिवाजीनगर मधील महिला वर्ग आणि युवकांनी अमर येळूरकर यांचे जल्लोषी स्वागत केले. ठिकठिकाणी फटाक्मयांची आतषबाजी, रांगोळी घालून आणि आरती ओवाळून अमर येळूरकर यांचे स्वागत करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो या घोषणांनी शिवाजीनगरचा परिसर दणाणून गेला. संपूर्ण शिवाजीनगर मधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला एकमुखी पाठिंबा देण्यात आला. शिवाजी नगरमध्ये एकच आवाज तो म्हणजे म.ए.समितीचाच असा नारा लावून जोरदार प्रचार करण्यात आला.









