फोंडा पालीकेजवळील रात्री दीड वा.घटना;सुदैवाने जीवीतहानी टळली
प्रतिनिधी/ फेंड़ा
तिस्क-फोंडा येथे नगरपालीकेजवळील दुर्गा कॅफे नामक चहा दुकानात भरधाव वेगाने चारचाकी घुसल्याने दुकानदाराचे लाखो रूपयांची हानी झाली. अपघाताची घटना शुक्रवारी उशिरा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मडगावहून फोंडा बसस्थानाकडे जाणारी कारगाडी फोंडा नगपालीकेजवळ पोचली असता चालकाचा ताबा गेल्याने वाहन विरूद्ध दिशेने मार्गक्रमण करीत सरळ दुर्गा कॅफे हॉटेलच्या पुढील खांबावर जोरदार धडक दिली. रस्त्यापासून सुमारे अर्धामिटर उंच असलेल्या फुटपाथवरून कारगाडीने हॉटेलसमोरील दर्शनी भागाच्या खांबावर धडक दिली. या धडकेत दुकानाचे पुढील भागाचे छप्पर कोसळून चारचाकी छप्परखाली अडकली. सुदैवाने रात्रीच्यावेळी घटना घडल्याने जिवीतहानी टळली अन्यथा दिवसभरात दुकान परिसरात नेहमी वर्दळीचा माहोल असतो. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी दुर्गा कॅफे हॉटेलचा दर्शनी भागाची पुर्णत: हानी झाली असून दुरूस्तीपर्यत दुकान बंद ठेवावे लागल्यामुळे आर्थिक फटकाही दुकानदाराला बसणार आहे.









