वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील 17 महापालिकांचे निकाल जाहीर झाले असून भाजपने सर्व जागांवर क्लीन स्वीप केला आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसचे खातेही उघडले नाही. तसेच सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या कानपूर महापालिकेत भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार प्रमिला पांडे दुसऱ्यांदा महापौर झाल्या आहेत. लखनौमध्ये भाजपच्या सुषमा खार्कवाल यांनी सपाच्या वंदना मिश्रा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. गाझियाबादमधून भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार सुनीता दयाल 2.87 लाख मतांनी विजयी झाल्या आहेत. प्रयागराजमध्ये भाजपचे उमेशचंद्र गणेश केसरवानी यांनी सपा उमेदवार अजय कुमार श्रीवास्तव यांचा 1 लाख 29 हजार 394 मतांनी पराभव केला आहे. अजय कुमार यांना 1 लाख 62 हजार 42 मते मिळाली.
गोरखपूरमध्ये सपा उमेदवार काजल निषाद यांनी पराभवानंतर संतप्त भावना व्यक्त केल्या. मतदानामध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही निवडणूक निष्पक्ष आहे यावर माझा विश्वास कसा बसेल? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसेच अखिलेश यादव यांनीही फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने गोरखपूरमधील मतमोजणीतील हेराफेरीच्या वृत्ताची तात्काळ दखल घ्यावी आणि मतमोजणीची सत्यता तपासून चूक आढळल्यास पुन्हा मतमोजणी करावी, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.









