बांधकाम संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कामगारांच्या मुलांना लॅपटॉप देण्याबाबत सूचना केली होती. मात्र लॅपटॉप दिले गेले नाहीत. कामगारांना देण्यात येणारी किट आमदार स्वतःकडे ठेऊन आपल्याच कार्यकर्त्यांना देत आहोत, असे सांगत आहेत. तेव्हा किटऐवजी बँक खात्यामध्ये रक्कम जमा करावी तसेच इतर मागण्यांसाठी बेळगाव जिल्हा कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढून निवेदन दिले.
कामगार कार्यालयाकडून सेंट्रिंग, गवंडी, प्लंबिंग, पेंटर आदी व इतर कामगारांना किट देण्यात येत होते. प्रारंभी कामगार कार्यालयाकडून त्याचे योग्य वितरण करण्यात आले. मात्र त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला. त्यामुळे वितरणामध्ये गैरप्रकार होत आहेत. तेव्हा कामगारांना देण्यात येणाऱया किटऐवजी त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
कामगारांच्या मुलांना लॅपटॉप देण्यात येणार होते. मात्र अद्याप त्यांना लॅपटॉप दिले नाहीत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही दिली गेली नाही. घर नसलेल्या कामगारांना घरासाठी 5 लाख रुपये देण्यात येणार होते. मात्र, अद्याप एकाही कामगाराला रक्कम दिली नसल्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. तेव्हा तातडीने या सुविधा पुरविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, ऍड. विष्णू लातूर, ऍड. यशवंत लमाणी, ऍड. विनोद पाटील, ऍड. रोहित लातूर यांच्यासह मोठय़ा संख्येने कामगार, विद्यार्थी उपस्थित होते.









