‘रोजगार मेळा 2023’ : पंतप्रधान मोदींकडून मार्गदर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 28 ऑक्टोबरला दिल्लीत राष्ट्रीय रोजगार मेळाव्याअंतर्गत 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले. आता नोकरी मिळणे सोपे झाले आहे. या महिन्यात रोजगार मेळाव्याचा प्रवास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये आम्ही ही मोहीम सुरू केल्यापासून भाजपशासित राज्यांमध्ये सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत, असे पंतप्रधान ‘रोजगार मेळा 2023’मध्ये मार्गदर्शन करताना म्हणाले.
आतापर्यंत लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आजही 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. दिवाळीला अजून काही अवधी बाकी आहे, मात्र नियुक्तीपत्रे मिळालेल्या 50 हजार तरुणांच्या कुटुंबीयांसाठी ही संधी दिवाळीपेक्षा कमी नाही, असेही पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितले.
देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे हे तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहेत. आमचे सरकार तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन मिशन मोडमध्ये काम करत आहे. आम्ही केवळ रोजगारच देत नाही, तर संपूर्ण व्यवस्था पारदर्शक ठेवत आहोत. देश सध्या ज्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ज्या गतीने वाटचाल करत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला.









