वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळानेही आता आपल्या व्यवहारांमध्ये इंडिया या शब्दाच्या स्थानी भारत हा शब्द उपयोगात आणण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. ही बाब रेल्वे विभागाच्या एका अहवालातून स्पष्ट झाली आहे. नुकताच हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाला सादर करण्यात आला. इंग्रजी भाषेत असणाऱ्या या अहवालात कोठेही इंडिया या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला नाही. त्याच्या स्थानी ‘भारत’ या शब्दाचाच उपयोग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने नुकतेच भारत हे नाव उपयोगात आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच इतरांनाही इंडिया या शब्दाच्या स्थानी भारत या शब्दाचा उपयोग करण्यास प्रोत्सानह देण्यात प्रारंभ केला आहे. भारताच्या घटनेत भारत आणि इंडिया या दोन्ही नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे भारत हे नाव रुढ करण्यात कोणताही घटनाभंग होत नाही, असे मत अनेक तज्ञांनीही व्यक्त केले आहे.
प्रथम प्रस्ताव
इंडियाच्या स्थानी भारत या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला रेल्वेचा हा अहवाल या संदर्भातील प्रथमच आहे, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यापुढे इतर विभागांचे अहवालही भारत या शब्दाचा उपयोग करुन निर्माण केले जातील अशी शक्यता आहे. एकंदर, आता केंद्र सरकारच्या कामकाजात इंडिया हा शब्द नाहीसा होणार असून भारत हा शब्दा रुढ होणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
एनसीईआरटीचीही सूचना
केंद्र सरकारच्या कार्यकक्षेतील शिक्षण संस्था एनसीईआरटीनेही आपल्या पुढच्या इंग्रजी पाठ्यापुस्तकांमध्ये इंडिया हा शब्द टाळून भारत शब्द उपयोगात आणण्याचे संकेत दिले आहेत. पाठ्यापुस्तकांची रचना करणाऱ्या या संस्थेच्या समितीलाही तशी सूचना देण्यात आली आहे. भारतात नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेतही भारत याच नावाचा उपयोग करण्यात आला होता.









