सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपनीने बदल करणे आवश्यक असल्याचे कारण : प्रशिक्षण थांबवण्याची रेडबर्डला सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह देशातील सहा ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या रेडबर्ड कंपनीची उड्डाणे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने थांबविली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंपनीने बदल करणे आवश्यक असल्याचे कारण देत डीजीसीएने रेडबर्डची सेवा थांबविली आहे. यामुळे बेळगावमधील वैमानिक प्रशिक्षणाला ब्रेक लागला आहे.
रेडबर्ड कंपनी बेळगावसह कलबुर्गी, पुणे येथील बारामती, आसाम लीलाबरी व श्रीलंकेत वैमानिक प्रशिक्षण देते. मागील पाच ते सहा महिन्यांपासून बेळगावमध्ये या कंपनीकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. बेळगाव विमानतळाच्या आवारात पाच हजार स्क्वेअर फूट जागेत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या कंपनीला जागा देण्यात आली होती. प्रशिक्षण सुरू असले तरी प्रशिक्षणादरम्यान अपघातांची संख्याही वाढली होती. आठवडाभरापूर्वी पुणे येथे झालेल्या अपघातामुळे डीजीसीएने प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा यंत्रणेत बदल केल्यास पुन्हा परवानगी
कंपनीने आपल्या सुरक्षा यंत्रणेत योग्य तो बदल केल्यानंतर त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार आहे. बेळगावमध्येही काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षणादरम्यान विमान थेट शेतामध्ये उतरवावे लागले होते. यामध्ये वैमानिक किरकोळ जखमी झाला असला तरी प्रशिक्षण विमानाचे मोठे नुकसान झाले होते. एखाद्यावेळी प्रशिक्षण विमान गावामध्ये उतरले असते तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. असाच प्रकार पुणे येथे घडल्यानंतर डीजीसीएने रेडबर्ड कंपनीची सेवा काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसात प्रशिक्षण पुन्हा सुरू
रेडबर्ड या वैमानिक प्रशिक्षण कंपनीने 23 ऑक्टोबरपासून आपले प्रशिक्षण थांबविले आहे. काही तांत्रिक कारणाने प्रशिक्षण थांबविल्याचे कंपनीने म्हटले आहे. येत्या काही दिवसात प्रशिक्षणाला पुन्हा सुरुवात होईल.
त्यागराजन (संचालक बेळगाव विमानतळ)









