आता पुढील बैठक 19 मार्च रोजी : ‘एमएसपी’च्या मुद्यावर शेतकरी ठाम
वृत्तसंस्था/ चंदीगड
पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी (एमएसपी) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची केंद्र सरकारशी शनिवार, 22 फेब्रुवारी रोजी चंदीगड येथे झालेली चर्चाही अनिर्णीत राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या फेरीमध्ये शेतकऱ्यांना थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर आपले विचार मांडण्याची संधी मिळाल्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. आता पुढील फेरीची चर्चा 19 मार्च रोजी चंदीगडमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची दुसरी फेरी पंजाबमधील चंदीगड येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही भाग घेतला. या बैठकीनंतर त्यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे स्पष्ट करत यापुढेही चर्चेची फेरी कायम राहील असे सांगितले. बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये खुली चर्चा झाली. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत विचार करण्यात आला. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू, असे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले.
एमएसपी हा चर्चेचा मुख्य मुद्दा
पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनीही बैठकीनंतर सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत आहे आणि या समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्रिय आहे, असे आश्वासन आम्ही शेतकऱ्यांना दिले असल्योही हरपाल चीमा म्हणाले. एमएसपी हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. या मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली असून यासंदर्भातील डेटा पुढील काही दिवसांत केंद्र सरकारसोबत शेअर केला जाईल. खुल्या बाजारात कोणती पिके आणि किती प्रमाणात विकली जातात याची माहिती पुरविली जाईल. शेतकरी संघटनांनी किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीचा आग्रह धरला, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
उपोषणावर डल्लेवाल ठाम
केंद्रीय कृषिमंत्र्यांनीही बैठकीपूर्वी उपोषण करणारे डल्लेवाल यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना उपोषण संपविण्याची विनंती केली. मात्र, डल्लेवाल यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणापासून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.









