30 ते 32 वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने वार करणारा हादी मातर (27) याला न्यूयॉर्क न्यायालयाने हत्येचा प्रयत्न आणि हल्ल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. मतरच्या शिक्षेची तारीख 23 एप्रिल निश्चित करण्यात आली असून त्याला आता 30 ते 32 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असे कायदातज्ञांचे मत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मातरने रश्दी यांच्यावर 15 वेळा चाकूने वार केले होते. यात रश्दी यांच्या डोक्याला, मानेला, धडाला आणि डाव्या तळहाताला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. याशिवाय त्यांच्या यकृत आणि आतड्यांचेही गंभीर नुकसान झाले.
रश्दी यांच्यावरील हल्ल्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी न्यूयॉर्कमधील चौटौक्वा काउंटी न्यायालयात झाली. याप्रसंगी रश्दींची मुलाखत घेणाऱ्या हेन्री कीजला जखमी केल्याबद्दलही न्यायालयाने मातरला दोषी ठरवले आहे. कीजच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. रश्दींवर हल्ला झाला तेव्हा त्या सभागृहात 1000 हून अधिक लोक उपस्थित होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान 77 वर्षीय सलमान रश्दी यांनी स्वत: न्यायालयात साक्ष दिली होती. याप्रसंगी रश्दींनी आपला दृष्टी गेलेला डोळाही उघडून दाखवला होता. त्यानंतर दोषी ठरलेल्या मातरने त्याच्या बचावात साक्ष दिली नाही. तसेच त्याच्या वकिलाने त्याच्या कोणत्याही साक्षीदारांना बोलावण्यास नकार दिला होता.









