टायगर सफारी लांबणीवर : गटार बांधणीचे काम लवकरच
प्रतिनिधी /बेळगाव
भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. मागील दीड वर्षात विविध वन्यप्राणी दाखल झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. दरम्यान प्राणी संग्रहालयात गटारी, रस्ते, शौचालय आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. रस्ते आणि शौचालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गटारीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे टायगर सफारी लांबणीवर पडली आहे.
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधला जात आहे. विविध प्राण्यांसाठी निवास कोठडी आणि शेड उभारले जात आहेत. सिंह, कोल्हा, सांबर, अस्वल, वाघ, बिबटे, काळविट, तरस आदी प्राणी दाखल झाले आहेत. शिवाय पर्यटकांना जवळून वाघाचे दर्शन व्हावे, यासाठी टायगर सफारी सुरू केली जाणार आहे. यासाठी रस्त्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. रस्ता, गटारी आणि इतर कामे मार्गी लावल्यानंतरच टायगर सफारीचा मार्ग मोकळा होणार आहे.
34 एकरात प्राणी संग्रहालय
प्राणी संग्रहालय तब्बल 34 एकरात पसरले आहे. यामध्ये विविध प्राणी ठेवण्यात आले आहेत. प्राण्यापर्यंत जाता यावे, यासाठी रस्त्याची उभारणी करण्यात आली आहे. त्याबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी पाणी, शौचालय आणि इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. विविध विकासकामे राबविली जात आहेत. सध्या गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्राणी संग्रहालयात रस्त्याची सुविधा
प्राणी संग्रहालयात सर्वत्र रस्त्याची सुविधा करण्यात आली आहे. शिवाय ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि शौचालय उभारण्यात आले आहे. तसेच गटारी बांधण्यासाठी साहित्य उपलब्ध झाले आहे. लवकरच संग्रहालयातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
– विनोद अंगडी (आरएफओ प्राणी संग्रहालय)









