तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास; दुचाकीस्वारांचे हाल
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा विपरित परिणाम मानवी शरीरावर होत आहे. यासाठी आरोग्य तज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, उष्णतेची लाट संपेपर्यंत हेल्मेट सक्तीपासून मुक्तता द्यावी, अशी मागणी दुचाकीस्वारांकडून करण्यात येत आहे. गरिबांचे महाबळेश्वर अशी बेळगावची ख्याती आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी नागरिक त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वळिवाचा पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळेसुद्धा उष्णतेत वाढ झाली आहे. सकाळी 8 पासून सायंकाळी 5 पर्यंत मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा बसत आहेत. पुन्हा रात्रभर उकाडा सहन करावा लागत आहे. पहाटे वातावरणात थंडी पसरल्यामुळे याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती आरोग्यतज्ञ देत आहेत. सकाळीच उष्णतेचा पारा वाढत आहे. दुपारपर्यंत उष्णतेचा पारा 38 ते 39 अंशांपर्यंत वाढत आहे. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यासाठीच महिन्याभरापूर्वी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून राज्यांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा इशारा देण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत हेल्मेट सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
हेल्मेटमुळे घामाचे प्रमाण वाढले
पंधरवड्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. त्यातच डोक्यावर हेल्मेट घातल्यामुळे घामाचे प्रमाण वाढत आहे. बेळगाव शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. चौकाचौकात सिग्नल बसविले आहेत. त्यामुळे प्रत्येक सिग्नलकडे दोन तीन मिनिटे थांबावे लागते, याचा परिणाम शरीरात उष्णता वाढून अनेक समस्यांना सामेरे जावे लागत आहे.
– महेश लगाडे, दुचाकीस्वार
किडणी, लिव्हरवरही परिणाम
सध्या सर्वत्र वातावरणाच्या बदलामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. साहजिकच घामाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, डोक्यावरील हेल्मेटमुळे त्यात आणखीनच वाढ होत आहे. घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन त्याचा परिणाम किडनी, लिव्हरवर होऊ शकतो. पाण्याची पातळी कमी झाल्याने अशक्तपणा येऊन उष्म्याला सामोरे जावे लागते. यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हेल्मेट व्यतिरिक्त कापडी टोपी, सुती कपडे वापरणे योग्य ठरू शकते.
– डॉ. टी. जी. पाटील









