निवडून आणण्याचा निर्धार : प्रचारफेरीत महिलांची लक्षणीय उपस्थिती
बेळगाव : ग्रामीणच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांची बुधवारी सायंकाळी हलगा गावात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे महिला व त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. तुम्हाला आम्ही निवडून देणार, असा ठाम निर्धारही उपस्थित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांची गावात प्रचारफेरी काढण्यात येणार असल्यामुळे गावातील काही बालकांनी व मुलींनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. त्यामुळे परिसरात एक नवचैतन्य निर्माण झाले होते. बेळगावची ऐतिहासिक शान असलेल्या राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. बेळगावकरांसाठी राजहंसगडावरील शिवरायांची मूर्ती ही अभिमानाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करायला हवे, असे हेब्बाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. विकास करताना मी कोणत्याही पद्धतीचे राजकारण करत नाही. प्रामाणिकपणे ग्रामीण जनतेची सेवा करते त्यामुळेच तुम्ही मला पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ठीकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत होते. लक्ष्मीताई तुम्ही आमच्या भागासाठी बरीच विकासकामे राबविलेला आहात. त्यामुळे या वेळेलाही आम्ही तुम्हालाच निवडून आणणार, असेही उपस्थित कार्यकर्ते व महिलांनी यावेळी सांगितले. हलगा गावातील विविध गल्ल्यांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.









