मुरलीधर पाटील यांच्या कोपरा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : आयुष्यभर म. ए. समितीसोबत राहिलो. पहिले आमदार बिरजे गुऊजांपासून समितीला मोठे मताधिक्मय दिले. आताही समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांनाच मत देणार तसेच शेवटच्या श्वासापर्यंत समितीलाच मत देणार, असा निश्चय कार्यकर्ते लक्ष्मण अष्टेकर यांनी व्यक्त केला. बेटगिरी (ता. खानापूर) येथे मुरलीधर पाटील यांची कोपरा सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सध्या आमची ओळखच पुसण्याचे काम सगळ्याच राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना तुम्ही-आम्ही स्वस्थ बसून चालणार नाही. 60 वर्षे एकहाती समितीचे नेतृत्व मान्य करून तालुक्मयाची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा आणि आमचे पूर्वज हे वेडे नव्हते. आपण सर्वजण आपल्या माय मराठीला विसरून राष्ट्रीय पक्षांच्या गोठ्यातील जनावर होण्यापेक्षा स्वाभिमानाची निशाणी असलेल्या सीमाचळवळीच्या पालखीचे भोई होऊया, असे विचार यशवंत बिरजे यांनी मांडले.
65 वर्षांपासून ‘आम्हाला आमच्या आईच्या मातृभाषेच्या राज्यात जोडा“ अशी मागणी करणारे आपण मात्र त्यांना वेडे वाटतो. मुर्ख वाटतो, याचा हिशेब आता विचारावाच लागेल. पण तो विचारणार तरी कसा? आम्ही आमच्या हक्कासाठी भांडुया, कारण संघर्ष करणे हे माणूस जिवंत असण्याचे प्रमुख लक्षण आहे. म. ए. समिती गावोगावी आणि तुमच्या दारोदारी व घरोघरी येणार आहे. खानापूर तालुक्मयात आजही प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान जपणारी मराठी भाषिक जनता आहे. हे आता दाखवून द्यावेच लागेल, असे मत विलास बेळगावकर यांनी मांडले. महाराष्ट्र धर्मासाठी, स्वभाषेच्या राज्यासाठी, छातीवर गोळ्या झेलणाऱ्या माणसांची औलाद आपण! आताजर आपण एकवटलो नाहीतर हुतात्म्यांचे आत्मे आम्हा सगळ्यांना शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. मराठीच अस्तित्व टिकविण्यात जर आपण कमी पडलो तर आपली गणना मेंदू गहान ठेवलेल्या समाजात केली जाईल, यासाठी प्रत्येकाला नव्या जोमाने लढावेच लागेल, असे आवाहन मुरलीधर पाटील यांनी केले. यावेळी भावकू सावंत, चंद्रकांत कांबळे, निलेश अडकुरकर, शंकर ठाणब, माऊती गुरव, राजू चिखलकर, वसंत नावलकर, जयराम देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.









