थांबा उभारला, तरी बससेवा नाही : प्रवाशांना करावी लागते रस्त्यावर खासगी बसची प्रतीक्षा
प्रतिनिधी /मडगाव
मोपा विमानतळावरील विमानसेवा सुरू झाल्यानंतर तेथे जाण्या-येण्यासाठी कदंब महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र मडगाव रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण झाल्यानंतर बसथांबा उभारण्यात येऊन महिने उलटले, तरीही अद्याप कदंब बससेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू झाल्यास रस्त्यावर राहून खासगी बसची वाट पाहणाऱया प्रवाशांची सोय होऊ शकते. त्यामुळे याकडे महामंडळाने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
केंद्रीय पर्यटन खात्याकडून मडगाव, थिवी आणि करमळी रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण करण्यासाठी 25 कोटींचा निधी देण्यात आलेला होता. या निधीतील 13 कोटी रुपये खर्च करुन मडगाव रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे. यात पादचाऱयांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी शेड, बसथांबा, स्टॉल्सची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच बहुमजली कार पार्किंगचे काम सध्या सुरू असून तळमजल्याचे काम पूर्ण होत आलेले आहे. उर्वरित काम चालू आहे.
बसथांब्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या परिसरातच बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी आवारातच एका बाजूने बस येण्यासाठी व दुसऱया बाजूने बस बाहेर जाण्यासाठी वाट ठेवण्यात आलेली आहे. वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला असला, तरी येथील बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. या ठिकाणी बेघर व भिकारी वास्तव्य करून राहत असून सुशोभिकरण केलेल्या जागेचा व सुविधांचा योग्य प्रकारे वापर होण्याची गरज व्यक्त होत आहे. याशिवाय बसथांब्यावर काही खासगी वाहने उभी करून ठेवण्यात येतात.
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यानंतर त्यांना टॅक्सीचा एकच पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे अनेक पर्यटक खासगी बसची वाट पाहत रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर उभे राहत असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रशासनाकडून बसथांबा उभारूनही बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे रेल्वेतून गोव्यात पर्यटनासाठी येणाऱया प्रवाशांना जादा पैसे खर्च करावे लागतात तसेच बसची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागते. पर्यटकांच्या सोयीसाठी कदंबने तत्काळ मडगाव रेल्वे स्थानकापासून मडगाव कदंब बसस्थानकापर्यंत शटल सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होईल आणि रेल्वेतून येणाच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, असे मत व्यक्त होत आहे.









