राज्यहितासाठी कदापी बघ्याची भूमिका घेणार नाही : प्रकाश वेळीप
प्रतिनिधी /फोंडा
गोव्याची जीवनदायीनी म्हादईच्या बचावासाठी राज्यभरातील बाराही तालुक्यातील एसटी बांधवांना संघटीत करू. राज्यहितासाठी बघ्याची भूमिका घेणे भूमिपुत्रांना कदापी मान्य नसून प्राथमिक स्तरावर जागृती बैठका घेतल्यानंतर जनआंदोलन उभारून सरकारला जाग आणून देणार असा ईशारा उटा (युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशन) संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यानी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी उटा संघटनेचे सरचिटणीस दुर्गादास गावडे, कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे, पदाधिकारी भालचंद्र उसगांवकर, मोलू वेळीप, दया गावकर, सतीश वेळीप, अनिल गावकर, सुर्यकांत गावडे उपस्थित होते. केंद सरकारने कर्नाटक राज्याला डीपीआरसाठी दिलेली मंजूरीमुळे म्हादई पाणी वळविण्यासाठी कळसा-बंडूरा प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. म्हादईच्या बचावासाठी सरकारमधील घटकानी कंबर कसली असून काही मंत्र्यांनी राजीनामाही देण्याचाही इशारा दिलेला आहे.
म्हादई नदीचा उगम कर्नाटक राज्यात झाला असला तरी आदिवासी समाजबांधवाप्रमाणे तिचे अस्तित्व प्राचीन आहे. एसटी आदीवासी समाज हा निसर्ग पूजक राहिलेला आहे. म्हादई बचावासाठी जात-धर्म मतभेद विसरून इतर संघटनाना बरोबर घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून उटा संघटना लढा उभारणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले. गोव्याची निसर्गरम्य प्रदेश म्हणून असलेली ओळख पुढील पिढीला राखून ठेवण्यासाठी सर्वानी संघटीत होऊया अशी हाक दिलेली आहे. म्हादईचे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात प्रलंबित असतानाही केंद्र सरकारने दिलेली मान्यता मागे घेण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वेळीप यांनी केले आहे.









