संभाव्य चौथ्या लाटेला थोपविण्यासाठी प्रयत्नांची गरज : साथीच्या आजारांबाबत जनजागृती आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा अनेक उद्योगधंद्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला आहे. परिणामी संभाव्य चौथी लाट थोपविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मास्क सक्ती व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना साथीच्या आजारांनीही डोकेवर काढले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने कंबर कसण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाला सुरुवात झाली की साथीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे याची दक्षता घेण्यासाठी सरकारी अधिकारी आणि आरोग्य खाते आवाहन करत आहे. मात्र प्रत्यक्षात गल्लोगल्ली जाऊन जागृती करण्यावर भर देण्यास मात्र तयार नाहीत. केवळ आवाहने आणि पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सतर्क करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जागृती केल्यास अधिक सोयीचे ठरणार असल्याचे मत अनेक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, संभाव्य चौथी लाट पुन्हा येणार अशी भीती तज्ञ व्यक्त करत असताना साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही आता आरोग्य खाते कोणत्या उपाययोजना आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाईचा बडगा आवश्यक
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अशा परिस्थितीत संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करा, याचबरोबर या सर्व आजारांबाबत घ्यावयाची काळजी याची माहिती जनतेला द्या. जे अधिकारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान, याबरोबरच आतापासूनच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
शहरासह ग्रामीण भागामध्ये साथीच्या आजारांना काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे. साथीचे आजार गंभीर असून याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र सरकारी अधिकारी आवाहन करून आपली जबाबदारी संपली असे म्हणून हात वर करण्यावरच भर देतात. नागरिकांनीही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जर गल्लीबोळात जागृती केल्यास प्रत्येक नागरिकांना याची माहिती उपलब्ध होणार आहे. साथींच्या आजारांबरोबरच संभाव्य कोरोनाच्या चौथ्या लाटेला थोपविण्यासाठीही प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.
शाळेच्या परिसरात स्वच्छता आवश्यक
सरकारी व खासगी वसतिगृहांमध्येही विद्यार्थ्यांना या आजारासंदर्भात मार्गदर्शन करण्यावर भर द्यावा, अक्षरदासोह योजनेंतर्गत देण्यात येणारा उरलेला मध्यान्ह आहार शाळेशेजारी फेकून नये, शाळा परिसरात स्वच्छता राखण्यासाठी शिक्षण खात्यातील अधिकाऱयांनी जातीने लक्ष देण्याची गरज असते. आतापासूनच याची काळजी घेतल्यास येणाऱया समस्यांना निपटवून लावण्यास वेळ लागणार नाही. दोन वर्षांपासून शाळांना सुटी होती. आता कुठे शाळांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजार असो किंवा कोरोनासारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणे गरजेचे
झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, घराच्या परिसरात स्वच्छता राखावी, गटारी स्वच्छ कराव्यात, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यास ते तातडीने बंद करावे, यासह शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. कॉलरा, मलेरिया हे आजारही उद्भवण्याची शक्मयता आहे. तेव्हा जनतेमध्ये या सर्व बाबींची जनजागृती करण्यासाठी सर्व अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात येते. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही. शाळेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.









