
अरबी समुद्राच्या कडेशी वसलेला गोमंतक आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील एका पर्वताच्या माथ्यावर वसलेले बेळगाव शहर. हे दोन्ही भू-प्रदेश आणि तेथील लोक एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. गोमंतक आणि बेळगाव यांच्यामधले भावबंध खूप प्राचीन, खूप मधुर आणि खूप स्नेहांकित असे आहेत.

पारतंत्र्याच्या काळात गोव्यात कॉलेज शिक्षणाची सोय नव्हती. ज्यांची ऐपत होती अशी मुलं-मुली अत्यंत अल्प प्रमाणात पुणे, मुंबई, धारवाड, बेळगाव अशा शहरांत कॉलेज शिक्षण घेण्यासाठी जात. 1948 साली बेळगाव शहरात राणी पार्वतीदेवी कॉलेज, या कला आणि विज्ञान शाखांचे शिक्षण देणाऱया संस्थेचे सावंतवाडीहून स्थलांतर झाले. सुदैवाने सुरुवातीपासून कॉलेजच्या संचालक मंडळात गोमंतकीयांच्या जवळच्या नातेवाईकांचा सामावेश होता. थोर गोमंतकीय विद्वान शिक्षणतज्ञ प्रा. फ्रांसिस्क कुरैया आफोंस हे कॉलेजच्या आरंभ काळात प्राचार्य म्हणून लाभले. संचालक मंडळांचे अध्वर्यु स्व. बाबुराव ठाकुर, डॉ. वाय. के. प्रभू, ऍड. वसंतराव हेरवाडकर, ऍड. डी. जी. देशपांडे यांना गोव्याबद्दल विशेष ममत्व होते. परिणामतः कॉलेजच्या बेळगावातील आगमनापासून गोव्यातील विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची रीघ लागली.
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, हरहुन्नरीपणा, नेतृत्व गुण, बुद्धिमत्ता भरपूर प्रमाणात लाभलेल्या गोवेकर तरुणाईचे प्रभुत्व कॉलेज व परिसरात दिसून येत असे. गोमंतकीय विद्यार्थ्यांना कॉलेज आपल्या घरासारखेच वाटायचे. काही अडचणी उद्भवल्यास त्यांचे निराकरण आदरणीय बाबुराव ठाकुर व त्यांचे सहकारी तत्परतेने करीत.
गोव्यात स्वातंत्र्यसंग्रामाचा महायज्ञ
पण त्याचवेळी गोव्यात स्वातंत्र्यसंग्रामाचा महायज्ञ पेटला होता. त्याची धग तरुणाईला लागल्याशिवाय कशी राहील? कॉलेज शिक्षण घेणाऱया अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात राष्ट्रवादाच्या आणि देशभक्तीच्या ज्वालांनी पेट घ्यायला सुरुवात झाली होती. काही ज्वालाग्राही मनात ज्वालांनी उग्र रूप धारण केले होते. कॉलेज जीवनाची फुले आणि देशभक्तीच्या ज्वाला एक साथ फुलत होत्या. इकडे गोमंतकात, जनतेमध्ये पोर्तुगीजांच्या पाशवी सत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण करण्याचे कार्य डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगाव येथे 18 जून 1946 रोजी केलेल्या सत्याग्रहाने केले. वन्ही चेतवला; त्याचे पुढे प्रचंड अग्निकुंड झाले. गोमंतकांत सत्याग्रह पर्व सुरू झाले. क्रांतिकारी सशस्त्र प्रतिकाराचा मार्गही काही सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी स्वीकारला. त्यांना पाशवी पद्धतीने चिरडण्याचे कार्य पोर्तुगीजांनी आरंभले.
गोव्याचे संताजी आणि धनाजी
सत्याग्रहींचे नेतृत्व करणाऱया ‘नॅशनल काँग्रेस-गोवा’ या संस्थेचे मुख्यालय टिळकवाडीतील लेले क्रीडांगणाच्या कोपऱयावरील इमारतीत होते. क्रांतिकारी आझाद गोमंतक दलाचे मुख्यालय कॅम्प भागात श्री महादेव मंदिराच्या जवळ होते. या दोन्ही संस्थांचे नेतृत्व करणारे कांही तरुण राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यांत आझाद गोमंतकाचे प्रभाकर सिनारी, प्रभाकर वैद्य, टोनी फर्नांडिस व दत्ताराम चोपडेकर या नेत्यांचा समावेश होता. अत्यंत निर्भयपणे दोन्ही प्रभाकर सशस्त्र क्रांतिकार्यात अग्रभागी होते. त्यांचा सशस्त्र लढा इतका जहाल होता की पोर्तुगीज सत्ताधीशांचा त्यांच्या नुसत्या स्मरणाने थरकाप होत असे. मोगलांना जसे संताजी आणि धनाजी तसे पोर्तुगीजांना प्रभाकर सिनारी आणि प्रभाकर वैद्य.
आतांपर्यंत या लढय़ात प्रामुख्याने गोमंतकीय नेते आणि गोमंतकीय जनता यांचा सहभाग होता. ते चित्र बदलले. उर्वरित भरतातील राजकीय नेते आणि जनता गोमंतकाच्या स्वातंत्र्यलढय़ात फार मोठय़ा संख्येने उतरली. ब्रिटिश सत्ता संपल्यानंतर पाँडिचरीतील प्रेंच सत्ता अस्तास गेली. आता राहिली गोव्यातील पोर्तुगीज सत्ता. भारताचे स्वातंत्र्य पूर्णत्वास नेण्यासाठी पोर्तुगीज राजसत्ता संपुष्टात आणणे गरजेचे होते.
गोवा विमोचन साहाय्यक समिती
भारतातील समाजवादी पक्ष लढय़ाच्या या नव्या पर्वात आघाडीवर होता. नंतर इतर पक्षही सामील झाले. 1955 साली गोवा विमोचन साहाय्यक समिती’ या नावाचा एक सर्वपक्षीय मंच गोमंतकाच्या नव्या सत्याग्रह पर्वाचे संचलन व नियंत्रण करण्याच्या उद्देशाने पुणे येथे स्थापन करण्यात आला. समितीत भारतातील श्रे÷ आणि ज्ये÷ राजकीय पुढारी ना. ग. गोरे, जयंतराव टिळक, केशवराव जेधे, र. के. खाडीलकर, शिरूभाऊ लिमये, रामभाऊ म्हाळगी आणि पं. महादेवशास्त्री जोशी प्रभृतींचा समावेश होता. या समितीच्या बेळगावातील कार्यालयाने नॅशनल काँग्रेस, गोवाच्याच कार्यालयाचा एक भाग व्यापला होता. गोवा विमोचन साहाय्यक समिती आपल्या कार्यात यशस्वी झाली. अखिल भारतीय पातळीवर हजारोंच्या संख्येने गोमंतकात जाऊन निःशस्त्र सत्याग्रह करण्यासाठी सत्याग्रही बेळगावात जमा होऊ लागले. तेथून गोमंतकात जाण्यास महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी बंदी घातली होती. तरीसुद्धा हजारोंच्या संख्येने सत्याग्रही गोव्यात सरहद्दीवर पोहोचले. त्या निःशस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगीज पोलीस आणि सैनिकांनी अमानुष गोळीबार केला. 15 ऑगस्ट 1955 या दिवशी सत्याग्रहाने परिसीमा गाठली. पोर्तुगीजांच्या पाशवी सत्तेच्या बळाचा अतिरेक झाला. 32 सत्याग्रही शहीद झाले. अनेक (225) जायबंदी झाले. पण कोणी मागे हटले नाही. पोर्तुगीज राजसत्तेची जगात नाचक्की झाली. 18 मे ते 9 जुलै 1955 पर्यंत सत्याग्रहींच्या 8 तुकडय़ांनी विविध मार्गांनी गोव्यात प्रवेश करून सत्याग्रह केला.
ऑगस्ट 1955 च्या आसपास जो महासत्याग्रह झाला त्याचा केंद्रबिंदू बेळगाव शहर होते. गोवा विमोचन समितीने 15 ऑगस्ट 1955 रोजी मोठय़ा प्रमाणात गोमंतकाच्या विविध भागांत अहिंसक सत्याग्रह कार्यक्रम घडवून आणले. त्याच्या आधल्या दिवशी, 13 ऑगस्ट रोजी बेळगावच्या नागरिकांतर्फे शहरातील मारुती देवस्थानात स्वातंत्र्यसैनिक अरविंद याळगी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. 14 ऑगस्ट रोजी शहरातील बसस्टँडवर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने सत्याग्रहींना गोमंतकातील अंगिकृत कार्यात यशस्वी व्हा, अशी सदिच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सत्याग्रहींच्या या जथ्याची बेळगावातील सर्व प्रकारची व्यवस्था कॉलेजचे तत्कालीन अध्वर्यु-संचालक बाबुराव ठाकुर, चतुरदास शाह आणि आत्माराम राघोबा आजगावकर यांनी मनोभावे यशस्वीरीतीने पार पाडली. कॉलेजच्या दोन तडफदार विद्यार्थिनी मंदा याळगी व आशा पोतदार या त्यावेळी गोवा विमोचन समितीच्या महिला शाखेच्या सचिव होत्या. त्यांनी वरील संचालक मंडळाला भरपूर साहाय्य केले.
गोमंतकाच्या महासत्याग्रह पर्वाच्या सुरुवातीपासून राणी पार्वतीदेवी कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि संचालक मंडळ त्या पर्वात सक्रियपणे कार्यरत होते. त्यांना बाबुराव ठाकुरांचे प्रेरक मार्गदर्शन आणि उत्तेजन लाभत होते.
बेळगाव … गोवामुक्तीचे एक केंद्र
15 ऑगस्ट 1956 च्या महासत्याग्रहासाठी मोरारजी देसाईंचा विरोध असतानासुद्धा जवळजवळ 35000 सत्याग्रहींनी नावनोंदणी केली होती. प्रत्यक्षात फार मोठय़ा संख्येने (3000) सत्याग्रही भारताच्या विविध प्रांतांतून, बेळगावात दाखल झाले. कॉलेजचे माजी विद्यार्थी, समाजसेवक आणि ऍड. राम आपटे यांच्या नेतृत्वाखाली दोनशे सत्याग्रहींची सोय जिमखाना हॉलमध्ये केली होती.
आरपीडीयन्सचा कॅसलरॉक येथील सत्याग्रह
आपीडीयन्सनी दोन वेळा गोमंतकाच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेऊन कॅसलरॉक येथे सत्याग्रह केला. पहिल्या सत्याग्रहाचे नेते होते सुप्रसिद्ध समाजवादी, संसदपटू आणि लोकनेते बॅरिस्टर नाथ पै. तो दिवस होता 18 मे 1955. प्रा. अरविंद याळगी, प्रा. गो. म. वाटवे, ऍड. राम आपटे, पी. एस. शहापूरकर, अशोक याळगी, विवेक याळगी, मल्लेश जुवेकर आणि दिनकर महात्मे यांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.
दुसरा कॅसलरॉक सत्याग्रह दि. 27 मे 1955 रोजी करण्यात आला. परशुराम शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली मंदा याळगी, आणि शिवराम रामचंद्र गवंडळकर हे सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यांनी तब्बल सात तास रेल्वेवाहतूक बंद पाडली आणि सबंध देशाचे लक्ष गोमंतकाच्या स्वातंत्र्यलढय़ाकडे ओढून घेतले.
1954-1955 या काळातील सत्याग्रह पर्वाने स्वातंत्र्य भारत सरकारला स्पष्टपणे दाखवून दिले की, भारतीय जनमानस पोर्तुगीज राजसत्तेविरुद्ध प्रत्यक्ष कृतीस अनुकूल आहे. गोमंतकाच्या स्वातंत्र्याशिवाय भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. पंतप्रधान नेहरूंना जनमानसाचा रेटा जाणवायला लागला होता. गोमंतकाची मुक्ती आता फार दूर नव्हती.
त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या मंत्र भारलेल्या काळात राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये शिकणारे गोमंतकीय विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्य होते. दोन्ही वसतिगृहामध्ये गोमंतकीय मुलांमुलींचाच जास्त भरणा होता. त्यातील अनेकांचा बेळगावात घडणाऱया गोमंतकाच्या स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित घटनांशी निकटचा संबंध येत होता. नॅशनल काँग्रेस, गोवाच्या टिळकवाडीतील कार्यालयात त्यांच्या वारंवार बैठका भरत होत्या.
बेळगावातून सुरू ऑपरेशन विजय
भारत सरकारने योग्य तो प्रतिसाद दिला. ‘ऑपरेशन विजय’ या नावाची सैनिकी मोहीम आखली. 1961 च्या वर्ष अखेरीस बेळगावात सैन्याची जमवाजमव केली. गोव्याजवळ नौसेना सज्ज केली. बेळगाव, पुणे, मुंबई येथे वायुसेनेला सावधान केले. जगाला कळून चुकले की आता गोमंतकात भारत सरकारची लष्करी कारवाई अटळ आहे. तसेच झाले. उत्तर, पूर्व आणि दक्षिण सरहद्दीतून कारवाई करण्यासाठी 17 डिसेंबर रोजी सैनिकांनी बेळगावहून कूच केले. 18 तारखेपर्यंत संपूर्ण गोमंतक ताब्यात घेतला. 19 तारखेस रात्री वास्को द गामा येथील नौसेना तळावर मोटारगाडय़ांच्या दिव्यांच्या प्रकाशात पोर्तुगीज गव्हर्नर जनरल व्हास्साल इ सिल्वा यांनी शरणनामा लिहून भारतीय सेनाधिकाऱयांकडे सुपूर्द केला. त्याक्षणी गोमंतकावरील पोर्तुगीज राजसत्ता संपुष्टात आली. गोमंतक मुक्त झाला. स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्याला परिपूर्ती लाभली. ते संपूर्ण झाले.
ऑपरेशन विजयच्या कार्यवाहींतसुद्धा आरपीडीयन्सचा थोडा फार सहभाग होता. लष्करी मोहीम सुरू करण्यापूर्वी बेळगावात मुक्काम असलेल्या सेनाधिकाऱयांना गोमंतकातील भू-प्रदेशाच्या सैनिकी नकाशांची सत्यता तपासून घ्यायची होती. त्या कार्यात सेनाधिकाऱयांना, माझ्या एनसीसीतील प्रशिक्षणाच्या आधारे मी साहाय्य करू शकलो याचा आनंद आहे. भारतीय सैन्य प्रत्यक्ष गोमंतभूमीत शिरले त्यावेळी आझाद गोमंतक दलाचे एक ज्ये÷ सेनाधिकारी प्रभाकर सिनारी, त्यांच्या सहकारी दल सैनिकांबरोबर भारतीय सैन्यांसमवेत मार्गदर्शन करण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर सक्रिय स्वातंत्र्य सैनिक दिनकर महात्मेसुद्धा होते. निश्चितपणे या सर्व मार्गदर्शकांच्या साहाय्यामुळे सैनिकी कारवाई सुलभ झाली. स्थानिक जनतेचे सहकार्य मोठय़ा प्रमाणात आणि सहजपणे मिळवता आले.
चार संघटनांची बनली एक लढाऊ संघटना 15 ऑगस्ट 1956 च्या महासत्याग्रहात प्राप्त झालेल्या भयानक अनुभवानंतर गोवा विमोचन साहाय्यक समितीने आपले कार्य स्थगित केले. स्वातंत्र्यलढा तर चालूच राहाणे गरजेचे होते. तो अधिक दमदार करणेही महत्त्वाचे होते. म्हणून स्वातंत्र्यलढय़ात अग्रभागी असलेल्या चार संस्था – 1) नॅशनल काँग्रेस, गोवा, 2) आझाद गोमंतक दल, 3) गोवा लिबरेशन कौन्सिल, 4) गोवा पिपल्स पार्टी एकत्र येऊन त्यांची ‘युनायटेड गोवन कौन्सिल’ नावाची एक नवी लढाऊ संघटना स्थापन करण्यात आली. आरपीडी कॉलेजचे माजी प्राचार्य, ख्यातनाम, बुद्धिवंत शिक्षणतज्ञ फ्रान्सिस्क कुरैया आफोंस हे त्या संस्थेचे एक प्रमुख संस्थापक संचालक होते. गोमंतकाची मुक्ती आणि गोमंतकाचे भारतात विलीनीकरण ही दोन प्रमुख उद्दिष्टे संस्थेने स्वीकृत केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहावर 1959 साली भारत भेटीवर आले असताना त्यांना गोमंतक मुक्तीचे निवेदन देऊन या नव्या संघटनेने मुक्तीच्या प्रश्नास जागतिक आयाम प्राप्त करून दिला, हे गौरवास्पद आहे. आरपीडी कॉलेजचे गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, तसेच संचालक मंडळाचे मान्यवर सभासद या सर्वांचे गोमंतकाच्या स्वतंत्र्य महासंग्रामास असाधारण असे योगदान लाभलेले आहे हे वरील निवेदनांतून प्रत्ययास येते. आज गोमंतकाच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षपूर्तीच्या दिवशी या अनन्य साधारण योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे प्रत्येक गोमतकीयांचे कर्तव्य आहे.









