महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव : पहिल्याच बैठकीचे अधिकाधिक कामकाज मराठीतूनच
बेळगाव : महापालिकेमध्ये मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिन्ही भाषांतून बैठकीच्या नोटिसा द्याव्यात. याचबरोबर बैठकीतील विषयपत्रिकाही मराठीतच द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तरीही यावेळी कन्नडमधूनच नोटिसा देण्यात आल्या. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या भाजपमधील मराठी नगरसेवकाने मराठी भाषेवरून राजकारण होत आहे, त्यामुळे पुढील बैठकीमध्ये मराठीत परिपत्रके देण्याची मागणी महापौरांकडे केली. त्यावर महापौरांनी निश्चितच पुढीलवेळी तिन्ही भाषांमध्ये परिपत्रके देऊ, असे आश्वासन दिले. महापालिकेमध्ये पहिलीच सर्वसाधारण बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी हे आश्वासन दिले आहे. म. ए. समितीचे आणि मराठी भाषिक असलेले नगरसेवक मराठीमध्ये नोटीस आली नाही म्हणून सभागृहामध्ये त्याची मागणी करणार, याची चाहुल भाजपमधील नगरसेवकांना होती. त्यामुळे पहिल्यांदाच त्यावर तोडगा काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. वास्तविक अधिक मराठी भाषिक नगरसेवक असल्यामुळे मराठीत नोटीस दिलीच पाहिजे. आजपर्यंत मराठीत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच सर्वसाधारण बैठकीला मराठीत नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
नगरसेवक रवी साळुंखे यांनीही मराठीत नोटीस तसेच अजेंडा नसल्यामुळे आम्हाला कोणते विषय आहेत ते समजत नाहीत. तेव्हा मराठीत नोटीस अजेंडा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सत्ताधारी भाजपने यापूर्वीच आम्ही मराठीसह तिन्ही भाषांत नोटीस देणार असल्याचा ठराव केल्याचे सांगितले. त्यामुळे आता पुढील बैठकीत मराठीमध्ये नोटिसा मिळणार, हे निश्चित झाले आहे. यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कन्नडमधून काही माहिती दिली. मात्र ती मराठी नगरसेवकांना समजलीच नाही. मराठी नगरसेवकांनी मराठीतून प्रश्न विचारले. त्यामुळे अतिउत्साही असलेल्या नगरसेवकांनी मराठीचे भाषांतर कन्नडमध्ये करून अधिकाऱ्यांना सांगितले. एकूणच पहिल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये मराठी नगरसेवक असलेल्या साऱ्यांनीच मराठीतूनच प्रश्न विचारले आणि महापौरांनीही मराठीतूनच उत्तरे दिली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
मराठीचेच वर्चस्व…
शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण बैठकीला प्रारंभ झाला. महापौर शौभा सोमणाचे यांनी पहिल्यांदाच सर्वसाधारण बैठकीचे महापौरपद भूषविले. त्यांनी मराठीतूनच काही उत्तरे दिली तर काहीवेळा नाईलाजास्तव कन्नड शब्द मराठी भाषेमध्ये लिहून त्याचे वाचन केले. पहिल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये सर्वात जास्त मराठीमधूनच प्रश्न-उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहामध्ये मराठीचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले.









