पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
गेले नऊ दिवस सुरू होते बेमुदत उपोषण
कोल्हापूर
कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे परिक्रमा खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करावे, याकरीता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत १५ मार्चपूर्वी जिह्यातील सर्व आमदार, खासदार आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासमवेत मुंबईमध्ये व्यापक बैठक बोलविण्यात येईल. या बैठकीत चर्चा करून, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्याविषयी ठोस अशी भूमिका घेतली जाईल, अशी माहिती जिह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी दिली. शहरातील दसरा चौकात उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे. या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपेषण आंदोलन स्थगितावेळी बोलताना दिली.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचची स्थापना करावी, याकरीता कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी सुलभता मिळवी. यासाठी गेल्या ३८ वर्षापासून यां सहा जिल्ह्यातील वकील आणि नागरिक सामुदायिकपणे रस्त्यावरील आंदोलन करीत आहेत. यांची गांभीर्याने दखल घेऊन गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची जी बैठक झाली. त्या बैठकीत या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी स्वत: आणि मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा करून, खंडपीठासाठी आवश्यक आर्थिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत १५ मार्चपूर्वी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या समवेत व्यापक बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या आश्वासनानुसार आमरण उपोषण करीत असलेले, माणिक पाटील चुयेकर यांनी आपले आमरण उपोषण आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. त्यानुसार पाटील-चुयेकर यांनी नऊ दिवसापासून शहरातील दसरा चौकात सुरू केलेले आमरण उपेषण आंदोलन स्थगित केले.
पाटील- चुयेकर यांनी पालकमंत्री आबिटकर, खासदार धंनजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अध्यक्ष आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत, अॅङ शिवाजीराव राणे आदींच्या हस्ते कलिगडचा ज्यूस देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अजित नरके, आमदार अशोकराव माने, माजी महापौर आर.के. पोवार, गणी आजरेकर, धनंजय मोरे, रविंद्र मोरे यांच्यासह जिल्हा बार असोसिएशन आणि कृती समितीचे पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








