वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाक पुरुष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी न्यूझीलंडच्या अष्टपैलू ग्रँट ब्रॅडबर्नची नियुक्ती केल्याची घोषणा शनिवारी पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे.
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ अलिकडेच पाकच्या दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी आला होता. या दौऱ्यावेळी पाक संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी ब्रॅडबर्नवर सोपविण्यात आली होती. या दौऱ्यामध्ये बाबर आझमच्या नेत़ृत्वाखालीलपाक क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा वनडे मालिकेत 4-1 असा दणदणीत पराभव केला होता. तर उभय संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली होती. स्कॉटलंडे क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक ब्रॅडबर्न यांनी 2018 ते 2020 या कालावधीत पाक संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पीसीबीने अलिकडेचल पाक संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर यांची संघाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे. अफगाण आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका तसेच आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आर्थर यांच्यावर ही जबाबदारी पीसीबीने टाकली आहे.









