कार्यकाळ पूर्ण करणार राज्य सरकार
वृत्तसंस्था/ चरखा दादरी
जजप आमदार नैना सिंह चौताला यांनी हरियाणातील भाजप-जजप आघाडी मजबूत असून विरोधक विनाकारण अफवा पसरवित असल्याचा दावा केला आहे. हरियाणात भाजपसोबतची जजपची आघडी फेविकॉल जोडसारखी मजबूत आहे. निवडणुकीनंतरची ही आघाडी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. विरोधी पक्षांच्या टिप्पणींमुळे आघाडी सरकारला काहीच फरक पडणार नसल्याचा दावा नैना चौताला यांनी केला आहे.
आघाडी सरकार प्रत्येक व्यक्तीला नजरेसमोर ठेवून विकासकामांवर लक्ष देत आहे. याचमुळे शासकीय योजनांचा लाभ थेट स्वरुपात सर्वसामान्यांना होत आहे. दिल्लीत धरणे आंदोलन करत असलेल्या क्रीडापटूंसोबत न्याय व्हायला हवा. जजप पक्ष देखील महिला कुस्तीपटूंसोबत आहे. दोषीला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा व्हायला हवी असे नैना चौताला यांनी म्हटले आहे.









