एकूण 14 जणांचा मृत्यू ः गाजारख शहरातील घटना
वृत्तसंस्था/ हेरात
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारी मशिदीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तालिबानच्या सर्वात मोठय़ा धर्मगुरुंपैकी एक मौलवी मुजीब उर रहमान अंसारी मानला गेला आहे. या स्फोटात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गाजारघ शहरात हा स्फोट झाला आहे. मागील महिन्यात देखील तालिबानचा एक मोठा नेता मारला गेला होता. या स्फोटामागे आयएसआयएसच्या खुरासान ग्रुपचा हात असल्याचे मानले जात आहे.
गाजारघ शहरातील मशिदीत एकूण 2 स्फोट झाले. स्फोटावेळी मशिदीत सामूहिक प्रार्थना सुरू होती. मुल्ला मुजीब याच मशिदीचा मुख्य इमाम होता. हा आत्मघाती हल्ला होता आणि यात दोन जण सामील होते असे मानले जात आहे. मुल्ला मुजीब स्फोटाच्या काही तासांपूर्वीच हेरात येथील एका परिषदेत सहभागी होऊन थेट मशिदीत पोहोचला होता.
मुल्ला मुजीबला तालिबानच्या सर्वात क्रूर नेत्यांपैकी एक मानले जात होते. मुलींचे शिक्षण तसेच मुलींच्या घरातून बाहेर पडण्याला त्याचा तीव्र विरोध होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याने एक फतवा काढला होता. यात तालिबानच्या राजवटीला कुणी विरोध केल्यास किंवा त्याचा आदेश न मानल्यास शीर धडावेगळे करण्यात येईल असे नमूद होते.
आयएसकेपीवर संशय
हेरात प्रांतात बुधवारीच तालिबान अन् आयएसआयएसच्या खुरासान ग्रुप म्हणजेच आयएसकेपी यांच्यात हिंसक संघर्ष झाला होता. या हल्ल्यात आयएसकेपीचे 3 दहशतवादी मारले गेले होते. या मृत्यूंचा सूड उगवणार असल्याचे आयएसकेपीने म्हटले होते. अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित केलेल्या तालिबानसमोर सर्वात मोठा धोका आयएसकेपीचा असल्याचे मानले जात आहे. हेरात समवेत देशातील अनेक हिस्स्यांमध्ये तालिबान अन् आयएसकेपीदरम्यान संघर्ष होत आहे.









