सेन्सेक्स 37 अंकांनी तेजीत ः निफ्टीमात्र घसरणीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स तेजीत तर निफ्टी काहीशा घसरणीसोबत बंद झाल्याचे दिसून आले. देशातील बाजारात शुक्रवारच्या सत्रात चढउताराचा प्रवास राहिला होता. मात्र जागतिक पातळीवर मिळताजुळता कल प्राप्त करत बाजार बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 36.74 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,803.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्ये मात्र दिवसअखेर 3.35 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,539.45 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी आयटीसी, एचडीएफसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले आणि टाटा स्टील यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.
जागतिक पातळीवर मात्र आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत तर चीनचा शांघाय कम्पोझिट हा लाभासह बंद झाला आहे. युरोपमधील प्रमुख बाजारांची सुरुवात ही तेजीसोबत झाल्याचे पहावयास मिळाले.
बाजाराची दिशा शुक्रवारी मजबूतीसोबतच संघर्षामध्ये राहिली होती. कारण यामध्ये अमेरिकेतील रोजगाराचे आकडे प्राप्त होण्याच्या अगोदर जागतिक बाजारात विक्रीचा दबाव राहिला होता. रोजगार आकडय़ावर फेडरल रिझर्व्हच्या निर्णयावर आगामी दिशा निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. तेल निर्यात देशांची संघटना (ओपेक)आणि सहयोगी देशांच्या बैठकीच्या अगोदर कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी राहिली. यामुळे जागतिक पातळीवर वृद्धीसह चिंता व्यक्त केली जात आहे.









