वाऱ्याचा वेग 115-125 किलोमीटर प्रतितास, 1 लाखाहून अधिक लोक सुरक्षितस्थळी

वृत्तसंस्था /गांधीनगर
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास गुजरातमधील कच्छ आणि द्वारका येथील सागर तटांना धडक दिली आहे. यावेळी या भागात 115 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वहात होते. गुजरात राज्यात या चक्रीवादळाने प्रचंड पाऊस पडत असून मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. हेच वादळ पाकिस्तानातील कराचीवरही धडकले असून तेथे प्रलय निर्माण झाल्याचे वृत्त आहे. अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. बिपरजॉय हे गेल्या दहा वर्षांमधील सर्वात मोठे चक्रीवादळ मानण्यात येत आहे. गुजरातच्या आपत्कालीन साहाय्यता कक्षाने या वादळाची तीव्रता लक्षात घेऊन आधीच 1 लाख लोकांहून जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हालविले होते. त्यामुळे जीवितहानी कमीतकमी झाली, असे प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मध्यरात्रीपर्यंत थरार
या वादळाची सागरतटाला धडक देण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यानंतर हे वादळ शांत होण्यास प्रारंभ होईल, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आधीपासूनच या वादळाची दिशा निश्चित समजल्यामुळे आपत्कालीन साहाय्यतेची सज्जता राखणे शक्य झाले.
थरकाप उडविणारा अनुभव
वादळ भूमीवर आदळू लागले त्यावेळी प्रचंड वारे घोंघावू लागले होते. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळग्रस्त भागांमध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले होते. काही घरांची छपरे उडाल्याने हानी झाली. बहुतेक जणांनी आधीच घर सोडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतला होता. प्रचंड वेगाच्या वाऱ्याने समुद्राच्या लाटा 15 मीटरपर्यंत उंच पोहचल्या होत्या. तटानजीकच्या अनेक बांधकामांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे. कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसामुळे काही प्रमाणात हानी झाली आहे.

महिलांचाही समावेश
सुरक्षितस्थळी नेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये 3,131 गर्भवती महिला, 8,900 बालके आणि 4,697 वयस्करांचा समावेश आहे. त्यांच्या सोयीसाठी 1,521 आश्रयगृहे आठ जिल्ह्यांमध्ये निर्माण करण्यात आली आहेत. सागरतटावरील सर्व आठ जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून तेथे प्रचंड पाऊस पडत आहे. कच्छ, राजकोट, जामनगर, पोरबंदर, देवभूमी द्वारका आणि अमरेली जिल्ह्यांना पावसाचा जबर तडाखा बसला.
प्रशासनाची विशेष सज्जता
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 25 तुकड्या वादळग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय भारतीय नौसेना आणि भूसेनेलाही सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली. भूसेनेने 27 तुकड्या भूज, जामनगर, देवभूमी द्वारका, गांधीधाम, धरणगाधरा, नालिया आणि मांडवी येथे नियुक्त केलेल्या आहेत. बडोदा, दिल्ली आणि अहमदाबाद येथे भारतीय वायुदलाने हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली आहेत. नौसेनेने जलतरणपटूंच्या 15 तुकड्या ओखा, पोरबंदर आणि बाखासुरा येथे नियुक्त केलेल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारची दलेही सज्ज आहेत.
वीजमंडळाची सज्जता
गुजरात वीजमंडळाने आपले कर्मचारी वादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये सज्ज ठेवले आहेत. त्यामुळे कोठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास तो त्वरित पुन्हा सुरु करणे शक्य होणार आहे. वादळ सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी वीज खंडित झाली होती. परंतु, ती त्वरित सुरु करण्यात आली. हॅम रेडिओ स्टेशन्स आणि उपग्रह फोन स्थानके स्थापन करण्यात आली असून त्यामुळे संपर्क व्यवस्था सुरु आहे.
रेल्वेगाड्या बंद
आठ सागरतटीय जिल्ह्यांची रेल्वेसेवा खंडित करण्यात आली असून एकंतर 78 गाड्या काहीकाळ बंद ठेवण्यात आल्या आहेत. वादळ शमल्यानंतर त्या त्वरित सुरु करण्यात येणार आहेत. वादळामुळे शक्यतो जीवितहानी होऊ नये आणि वित्तहानी कमीत कमी व्हावी, अशाप्रकारे योजना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानमध्ये मोठी हानी
या वादळाचा अधिक तडाखा पाकिस्तानच्या कराची भागाला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रलयासारखी स्थिती उद्भवली असून प्रशासनाची शक्ती कमी पडत असल्याचे तेथील प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे. अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला असून मार्ग वाहतूक आणि दूरसंचार व्यवस्थाही बंद पडली असल्याचे वृत्त आहे.
भीषण वादळाचा तडाखा
- प्रशासनाकडून आधीच सज्जता केली गेल्याने हानी कमी प्रमाणात
- 1 लाखाहून अधिक नागरिकांना आधीच हलविले सुरक्षित स्थानांवर
- भारतीय भूसेना, नौसेना आणि वायुसेनाही साहाय्यतेसाठी सज्ज









