मंगळवारी यात्रेसाठी केला पहिला धार्मिक विधी : तब्बल 30 वर्षांनंतर भरणार यात्रा
वार्ताहर /किणये
बिजगर्णी-कावळेवाडी गावची ग्रामदेवता लक्ष्मेदेवीची यात्रा 2024 साली भरविण्याचा निर्णय दोन्ही गावातील ग्रामस्थ व पंचकमिटीने घेतला आहे. यात्रा भरविण्यासाठी पहिला धार्मिक विधी कार्यक्रम मंगळवारी बिजगर्णी गावात मोठ्या उत्साहात झाला. यात्रा भरविण्यात येणार असल्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिजगर्णी-कावळेवाडी गावची लक्ष्मेदेवी यात्रा 2024 मधील मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरविण्यात येणार आहे. तब्बल 30 वर्षानंतर यात्रा होणार असल्याने नागरिकांना आतापासूनच यात्रेची उत्सुकता लागून राहिली आहे. मंगळवारी गावात धार्मिक विधी कार्यक्रम झाला. सकाळी पारंपरिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढून गावातील सर्व देवदेवतांची पूजा-अर्चा करण्यात आली. प्रारंभी लक्ष्मी मंदिरात पूजा केली. त्यानतंर ब्रम्हलिंग मंदिर, कलमेश्वर, भावकाई, मार्ताळ, चव्हाटा देवस्थान आदी मंदिरामध्ये विधीवत पुजा केली. त्यानंतर सुवासिनींनी दिवसभर देवीची ओटी भरली.
नियोजन टप्प्याटप्प्याने करणार
य् ाापूर्वी 1994 साली लक्ष्मीदेवीची यात्रा भरविण्यात आली होती. पुढीलवर्षी यात्रा होणार असल्यामुळे ग्रामस्थ व पंचकमिटी यात्रेचे नियोजन टप्प्याटप्प्याने करणार आहेत. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला ग्रामस्थ कमिटीचे चेअरमन वसंत अष्टेकर, कल्लाप्पा अष्टेकर, विष्णू मोरे, दामु मोरे, श्रीरंग भास्कर, तारचंद जाधव, यशवंत जाधव, सुभाष पाटील, जकाप्पा मोरे, जोतिबा मोरे, मारुती जाधव, विष्णू कोळी, निंगाप्पा जाधव आदींसह गावातील सर्व युवक मंडळांचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









