केंद्रीय गृह मंत्रालयाने उचलले पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनुकंपा नियुक्तीसंबंधी स्वतःच्या धोरणात मोठा बदल केला आहे. सेवाकाळादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तसेच वैद्यकीय आधारावर सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनाही अनुकंपा नियुक्ती मिळणार आहे. अशा कर्मचाऱयांच्या कुटुंबांना गरीबीपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सुधारित धोरणामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱया सर्व कर्मचाऱयांना लाभ होण्याची शक्यता आहे. यात निमलष्करी दलाचे कर्मचारी देखील सामील आहेत. गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार अनुकंपा नियुक्ती योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱयावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा आधारावर नोकरी प्रदान करणे आहे. सेवाकाळादरम्यान मृत्यू झालेल्या किंवा वैद्यकीय कारणांमुळे निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्याला ही नोकरी देण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱयांच्या कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे.
प्रक्रियेत पारदर्शकता
नव्या दिशानिर्देशांमुळे अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता तसेच निष्पक्षता येणार आहे. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे समग्र मूल्यांकन, कमाविणारे सदस्य, कुटुंबाचा आकार, मुलांचे वय यासारख्या पैलूंना विचारात घेत नियुक्तीचा निर्णय घेतला जावा असे दिशानिर्देशांमध्ये म्हटले गेले आहे. तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजाही विचारात घेतल्या जातील.
अनुकंपा नियुक्तीचे दिशानिर्देश..
मृत सरकारी कर्मचाऱयाच्या कुटुंबीयाला अनुकंपेच्या आधारावर नियुक्ती मिळवून देण्यास कल्याण अधिकारी मदत करणार.
प्राप्त अर्जांच्या मूल्यांकनासाठी विविध मुद्दय़ांवर आधारित पात्रता योजना स्वीकारली जाणार.
प्रत्येक अर्जाला एक विशिष्ट आयडी प्रदान केला जाणार, छाननी समिती अर्जाची तपासणी करणार.
अर्जदाराला पहिल्या टप्प्यात पाचारण केले जाणार, कागदोपत्री प्रक्रियेसंबंधी सल्ला दिला जाणार.
अर्जांवर मंत्रालयातील उपसचिव किंवा संचालक पदावरील तीन अधिकाऱयांच्या समितीकडून होणार विचार.
कुटुंबाचे एकूण उत्पन्न, मुलांची संख्या, कुटुंबातील दिव्यांग व्यक्ती, अविवाहित मुलींची संख्या या विविध पैलूंवर विचार करत निर्णय घेतला जाणार.









