भारतीय वंशाचे ऋषी सुनाकही शर्यतीत ः लिस ट्रस पदाकरता सर्वात प्रबळ दावेदार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांची जागा घेणाऱया सत्तारुढ ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’च्या नव्या नेत्याची तसेच देशाच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. पक्षाच्या नेतृत्व निवडीसाठी जबाबदार शाखेने यासंबंधी माहिती दिली आहे. ‘1922 कमिटी ऑफ कॉन्झर्व्हेटिव्ह बॅकबेंच’च्या खासदारांनी निवडणुकीसाठी वेळापत्रक आणि नियम निश्चित केले आहेत. निवडणुकीच्या नामांकनाची प्रक्रिया अधिकृतपणे मंगळवारी सुरू होत समाप्त देखील झाली आहे.
पंतप्रधानपदासाठी आतापर्यंत पक्षातील 11 नेत्यांनी दावा केला आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे माजी कॅबिनेट मंत्री ऋषी सुनाक आणि विदेशमंत्री लिज ट्रस कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीत बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. निश्चितपणे 5 सप्टेंबर रोजी नवा पंतप्रधान कोण असणार, याचे उत्तर आमच्याकडे असेल, असे उद्गार ‘1922 समिती’चे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी काढले आहेत. टोरी या नावाने ओळखल्या जाणाऱया पक्षाचे नेतृत्व मिळविणारा नेता ब्रिटनचा पंतप्रधान होणार आहे.
सुनाक, ट्रस याच्यासह माजी आरोग्यमंत्री साजिद जाविद देखील या पदासाठीचे दावेदार ठरले आहेत. भारतीय वंशाच्या ऍटर्नी जनरल सुएला ब्रेवरमॅन, इराकी वंशाचे नादिम जहावी, नायजेरियन वंशाच्या केमी बेदानोक, कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य टॉम टुगॅनडॅट, माजी विदेशमंत्री जेरेमी हंट, व्यापारमंत्री पेनी मोरडॉट आणि परिवहन मंत्री ग्रँट शेप्स हे देखील या पदाच्या शर्यतीत सामील आहेत.
भारतीय वंशाच्या वरिष्ठ नेत्या तसेच ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांचेही नाव या यादीत सामील होऊ शकते. पटेल या ब्रेक्झिट समर्थक म्हणून पंतप्रधानपदाकरता स्वतःची दावेदारी सादर करू शकतात. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे खासदार मतदानानंतर अंतिम दोन उमेदवारांची निवड करतील. त्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्य स्वतःच्या नेत्याची निवड करणार आहेत.









