अमेरिकेचे रक्षण करू शकणार नाही
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
अमेरिका आणि दक्षिण कोरियादरम्यान आण्विक करार झाल्याने उत्तर कोरिया संतापला आहे. हुकुमशहा किम यांची बहिण किम यो जोंग यांनी सैन्यसामर्थ्याचे अधिकाधिक प्रदर्शन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे वृद्ध तसेच कमकुवत झाल्याचे म्हणत त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जो बिडेन यांनी उत्तर कोरियाच्या सत्तेवर दिलेले विधान अत्यंत बेजबाबदार आहे. बिडेन हे अमेरिकेची सुरक्षा आणि भविष्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम नाहीत. बिडेन हे वृद्ध व्यक्ती असून त्यांचे कुठलेच भविशय नाही. बिडेन यांना स्वतःचा कार्यकाळ पूर्ण करणे देखील अत्यंत अवघड असल्याचे यो जोंग यांनी म्हटले आहे.
26 एप्रिल रोजी बिडेन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी अण्वस्त्रांशी निगडित एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराला ‘वॉशिंग्टन डिक्लेरेशन’ नाव देण्यात आले होते. कराराच्या अंतर्गत अमेरिका स्वतःची आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रयुक्त पाणबुडी दक्षिण कोरियाच्या बंदरावर पाठविणार आहे.
उत्तर कोरियाने आण्विक हल्ला केल्यास तेथील सत्तेच्या अंताचे ते कारण ठरणार आहे. उत्तर कोरियाकडून येणाऱया प्रत्येक धोक्याच्या विरोधात आमच्या सहकाऱयांसोबत मिळून प्रत्युत्तर देऊ असे बिडेन यांनी म्हटले हेते.
अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील करार हा त्यांच्या आक्रमक भूमिकेचा पुरावा आहे. दोन्ही देश क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षेला धोक्यात आणू पाहत आहेत. बिडेन आणि येओल यांच्यातील बैठकीने आण्विक क्षमता वाढविण्याच्या आमच्या निर्णयाला योग्य ठरविले असल्याचा दावा किम यो जोंग यांनी केला आहे.
आमच्या शत्रूंनी आण्विक युद्धासाठी सराव करत कोरियन उपखंडात शस्त्रास्त्रs तैनात केल्यास उत्तर कोरिया स्वतःच्या रक्षणासाठी अधिकाधिक पावले उचलणार असल्याचे किम यो जोंग यांनी म्हटले आहे.









