आप आमदार ठरला दोषी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमानला एका शासकीय शाळेच्या मुख्याध्यापिकेला मारहाण आणि धमकाविणे महागात पडले आहे. 2009 मधील या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने आमदार रहमान यांना दोषी ठरविले आहे. तसेच आमदाराची पत्नी आसमालाही दोषी ठरविण्यात आले आहे. अब्दुल रहमान हे सीलमपूरचे आमदार आहेत.
आसमाने 4 फेब्रुवारी 2009 रोजी मुख्याध्यापिकेला थप्पड लगावली होती. तक्रारदार त्यावेळी दिल्लीच्या जाफराबाद भागातील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी आसमा या दोघांनाही मुख्याध्यापिकेला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या दोघांच्या विरोधात रजिया बेगम यांनी तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आप आमदार रहमान यांना दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास विधानसभा सदस्यत्व गमवावे लागू शकते.









