भगवंतानी भगवद्भक्ती करण्याच्या उद्देशाने पूजाविधी सांगावा अशी विनंती उद्धव भगवंताना उद्धवाने केली कारण भक्ती केल्याशिवाय विरक्ती येत नाही असं देवानीच सांगितलं आहे. त्यामुळे अत्यंत मनोभावे प्रार्थना करून उद्धव म्हणाला, तुझ्या पूर्ण कृपेची प्राप्ती होण्याच्या दृष्टीने तुझे पूजाविधान मला कृपा करून सांग. मी तुझे अत्यंत दीन लेकरू आहे. तू कदाचित म्हणशील की, तुला पूजेचा अधिकार नाही पण श्रीकृष्णा! मी तुला शरण आलो आहे. तू शरणागताची कधीही उपेक्षा करत नाहीस कारण शरणागताचा उद्धार करण्याचं वचन तू दिलं आहेस आणि हजारो वेळा यापूर्वी तू ते निभावलही आहेस. तेव्हा माझ्यावरही तशी कृपा कर. कदाचित तू म्हणशील की, सृष्टीमध्ये ब्रह्मदेव, शंकर वगैरे असताना मलाच विचारण्याची श्रद्धा तुझ्या मनात का निर्माण झाली? तर त्याचेही कारण सांगतो. ब्रह्मदेव हा जगाचा निर्माणकर्ता आहे तरीही त्याला अहं ब्रह्मास्मी असे स्फुरण झाल्याने तो आत्मस्वरूपाला विसरला. म्हणून तो तुझ्याच पोटी येऊन तुझ्यापासूनच आत्मज्ञान शिकला. तसेच सदासर्वदा तुझ्याच नामाचा जप करून तुझ्या कृपेमुळेच ते आत्मस्वरूप पावले. ह्यास्तव हे श्रीकृष्णा, तू ईश्वराचाही ईश्वर आहेस, नियंत्याचा नियंता जो सर्वेश्वर तो तूच आहेस. विश्वाचा विश्वंभर व विश्वेश्वरही तूच आहेस. अशा प्रकारे तू ज्ञानाचा निधी असून पूर्णबोधाचा सागर आहेस. ह्याकरिता जेणेकरून आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तो पूजाविधी मला सांगावास. उद्धवाने एव्हढी कळकळीची विनंती केल्यावर भगवंत संतोष पावले. उद्धव हा आपला अनन्य भक्त आहे हे जाणून त्याच्याबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले. भक्ताच्या योगक्षेमाची म्हणजे आत्यंतिक भले होण्यासाठी जे काही करायला हवे ते पूर्णपणे करण्यासाठी आत्मकृपेने कळवळलेल्या मनाने भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा! कर्मकांडांच्या विस्ताराला काही मर्यादाच नाही म्हणून मी थोडक्यात पहिल्यापासून याचे वर्णन करतो. ज्याचे वचन ऐकताच वेदवाणीलाही मौन पडते, ज्याची आठवण करताच मन हे स्वत: मनपणाला मुकते जो वेदार्थाचा प्रकाशक, जो सूर्याचाही आदिसूर्य अशा यदुनायक भगवंतानी स्वत:हून तयारी दाखवली. मग उद्धवच्या भाग्याला पूर आला. श्रीकृष्ण उद्धवाला पुजाविधीबद्दल सांगू लागले. ते म्हणाले, वेद व शास्त्रs यांनी जो माझ्या पूजेचा विधी सांगितला आहे, तो जर मी सविस्तर सांगावयास लागलो, तर तो अनंत आणि अपार आहे. ब्रह्मादिकांनासुद्धा त्याचा अंतपार लागावयाचा नाही. उद्धवा! खरोखर सांगतो ऐक. मी देवाधिदेव जरी सांगू लागलो, तरी सारे पूजाविधीविधान मलाही सांगवणार नाही. कितीही ज्ञानसंपन्न झाले तरी, पूजाविधीचे विधान सांगण्याचे सामर्थ्य कधीच कोणाच्या अंगी असणे शक्य नाही. ह्यास्तव पूर्वी सांगितल्याप्रमाणे वेदशाखातील सार निवडून काढून संक्षेपाने सांगेन. पूजाविधीचे सार वैदिक, तांत्रिक व मिश्र असे तीन प्रकारचे आहे. विधी उपचाराच्या विभागांप्रमाणे त्यांचाही विचार ऐक. या तिन्हींपैकी जो अनुकूल वाटेल, त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. गंमत म्हणजे भगवंतानी त्यांची पूजा कशी करायची हे सांगायला सुरवात केली खरी पण पूजेचे नाना प्रकार आणि तितकेच पूजाविधी त्यांना आठवले. शेवटी ते म्हणाले मला जे योग्य वाटतंय ते सार रूपाने तुला सांगतो तथापी भक्ताने त्याला आवडेल, अनुकूल असेल त्या पद्धतीने भक्तिपूर्वक माझी पूजा करावी. भगवंतांच हे मनोगत जाणून योगेश्वर अभ्यंकर त्याच्या भक्ती गीतात म्हणतात, हरी भोवती नित्य नाचतो, भक्तांचा मेळा हरी भक्तिचा भुकेला, पहाटसमयी जात्यावरती, दळू लागला जनीसंगती, ओवी गाऊन हा जगजेठी, भक्ताघरी रंगला, हरी भक्तिचा भुकेला, घास घेई नारायणा नारायणा, नामदेव तो हट्ट सोडिना, श्रीपतिराणा त्रिभूवनाचा, भक्तासवे जेवला, हरी भक्तिचा भुकेला, कबिराघरचे विणले शेले, भक्त प्रभू ते एकचि झाले, भक्तासवे त्या प्रभू नाचले, घेउनि भक्ति ध्वजा.
क्रमश:









