उद्या-परवा ‘भारत मंडपम’मध्ये शिखर परिषद : बायडेन, ऋषी सुनक आज दाखल होणार : जगातील सुमारे 30 देशांचे राष्ट्रप्रमुख, नेते, प्रतिनिधी सहभागी होणार,‘भारत मंडपम’सह दिल्लीतील हॉटेल्स, मार्गावर बहुस्तरीय सुरक्षा तैनात,दिल्ली, विमानतळापासून रस्त्यांपर्यंत देशाच्या सांस्कृतिक ठेव्याची झलक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या जी-20 च्या नेत्यांची शिखर परिषद दिल्लीत शनिवारपासून सुरू होत आहे. भारताच्या राजधानीत पहिल्यांदाच होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापासून ते पॅनडा, चीन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही सहभागी होत आहेत. सुमारे 30 देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेच्या निमित्ताने देशात दाखल होत असल्याने राजधानी दिल्लीत अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या जागतिक परिषदेच्या निमित्ताने सजावट आणि विद्युत रोषणाईही करण्यात आली असून संपूर्ण शहराने नवा साज परिधान केला आहे.
जी-20 शिखर परिषदेपूर्वी देशांचे प्रमुख आणि जागतिक संघटनांचे स्वागत करण्यासाठी दिल्ली पूर्णपणे तयार आहे. परदेशी पाहुणे दिल्लीतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. जी-20मध्ये अतिथी देश म्हणून आमंत्रित केलेले नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद टिनुबू 6 सप्टेंबर रोजीच भारतात आले. ते ले मेरिडियन हॉटेलमध्ये थांबले आहेत. 7 सप्टेंबर रोजी मॉरिशस, मेक्सिको आणि ईयु कौन्सिलच्या प्रमुखांव्यतिरिक्त आयएमएफ, ओईसीडी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख भारतात पोहोचले आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषद असल्यामुळे बहुतांश राष्ट्रप्रमुख शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी भारतात पोहोचणार आहेत. जी-20 परिषदेच्या तयारीसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रशिया-युव्रेन युद्धानंतर भू-राजकीय मतभेद तीव्र झाल्यानंतर होणाऱ्या या जी-20 शिखर परिषदेत जगातील अनेक गंभीर समस्यांवर चर्चा केली जाईल. युद्ध आणि दहशतवाद यासारख्या प्रकरणांमुळे जागतिक स्तरावरील प्रगतीला मोठा धोका निर्माण होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या चिंतेवरही जागतिक नेते चर्चा करतील. या सगळ्यासाठी भारत यजमान देशाची भूमिका बजावत असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सध्या भारताकडे लागलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचत असून ते आयटीसी मौर्य येथे मुक्काम करणार आहेत. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि शिखर परिषदेत स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक प्रथमच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. 43 वषीय ब्रिटीश पंतप्रधान सुनक यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना जी-20 शिखर परिषदेसाठी ‘योग्य वेळी योग्य देश’ निवडल्याचा दावा केला आहे.
चीनच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी पंतप्रधान ली कियांग हे चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. पण बायडेन यांच्याशी त्यांची भेट होण्याची शक्मयता कमी दिसते. चिनी शिष्टमंडळ दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये राहणार आहे.









