सेवेत कायम करण्यासह पूर्ण वेतन देण्याची मागणी : नगरसेवक रवी साळुंखे यांचे आयुक्तांना निवेदन
बेळगाव : महापालिकेत हंगामी तत्त्वावर काम करणाऱया माळी, वॉचमन आणि इतर कर्मचाऱयांचा पगार पूर्ण दिला जात नाही. गेल्या कित्येक वर्षापासून सेवा बजावूनही कायम करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. तसेच पूर्ण वेतन देण्याची व्यवस्था करावी, अशा विनंतीचे निवेदन देण्यात आले. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी हे निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या कार्यालयात वॉचमन म्हणून हंगामी तत्त्वावर कामगार घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शहर आणि उपनगरात असलेल्या उद्यानात माळी काम करणारे कामगारदेखील कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. याकरिता कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. पण सदर कंत्राटदार हंगामी कामगारांचे वेतन वेळेवर आणि पूर्ण देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. अनेक कामगारांच्या पगारात कात्री लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेने कामगारांच्या खात्यावर पगार जमा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पगार खात्यावर जमा केला तरी बँकेतून काढलेली रोख रकमेची मागणी सदर कंत्राटदार करीत आहेत. काम जाईल या भीतीपोटी कोणीही याबाबत तक्रार केली नाही. मात्र ही बाब नगरसेवक रवी साळुंखे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी माळी कामगार आणि वॉचमन यांच्या पगाराबाबत महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. तसेच महापालिकेकडे काम करणाऱया कामगारांचे वेतन पूर्ण आणि वेळेवर देण्यात यावे, असे निवेदन महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांना दिले आहे. अनेक कामगार गेले कित्येक वर्षापासून महापालिकेत कंत्राट पद्धतीने काम करीत आहे अशा कामगारांना सेवेत कायम करण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अनेक हंगामी कामगार उपस्थित होते.









