बेळगाव सफाई कामगार हितरक्षण समितीची मागणी : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना निवेदन
बेळगाव : मॅन्युअल स्कॅव्हेंजर आणि सफाई कर्मचारी राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा म्हैसूर शहर व राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष नारायण म्हैसूर यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी मागणी बेळगाव सफाई कामगार हितरक्षण समितीतर्फे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे करण्यात आली. विविध मागण्यांसाठी बेळगाव सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने कन्नड साहित्य भवन येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, कार्याध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी आदी उपस्थित होते. विजय निरगट्टी म्हणाले, नारायण म्हैसूर यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केल्यास राज्यातील आठ लाख सफाई कामगारांचे जे स्वप्न आहे ते खरोखर सत्यात उतरेल. परंतु आतापर्यंत ही दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झालेली नाही.
सुमारे 40 वर्षांपूर्वी सफाई कामगारांचे जनक म्हणून ओळखले जाणारे आय. पी. डी. सालप्पा हे या समुदायाचे एकमेव आमदार होते. पण, त्यांच्यानंतर आतापर्यंत या अत्यंत मागासलेल्या, दुर्लक्षित, शोषित समुदायाला कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. नारायण म्हैसूर यांना राज्यातील सर्व नागरिकांच्या आरोग्यसेवेची सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी एक म्हणून विचारात घ्यावे, व त्यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी. कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून राज्य आयोग अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे राज्य सफाई कर्मचारी आयोगावर लवकर अध्यक्षांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली. राज्य सरकारने कोठेही मॅन्युअल स्कॅव्हेंजर नाहीत, असा चुकीचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करावा. बेळगाव महापालिकेत 300 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेतली जाणार असून मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणून ओळखले गेलेल्या 396 कुटुंबातील 82 तऊणांना भरतीत प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









